Pune Car Accident Case, Ajay Taware and Sunil Tingare: डॉक्टर अजय तावरे (Ajay Taware) हा रक्ताचे नमुने बदलणे, यापुरते मर्यादित नाहीत. गेल्या दहा वर्षात तावरेंनी काय-काय पाहिलं, मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं?, हे सगळं तावरेंकडून समोर येऊ शकतं, असा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघातावरुन (Pune Car Accident) सरकारवर टीकास्त्र साधलं.
सुषमा अंधारे यांनी आज आमदार सुनील टिंगरे यांचंही नाव घेतलं. ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये अनेक ग्लॅमरस नेम-फेम असणारे आणि बडे प्रस्थ दाखल झाले. हे बडे प्रस्थ मध्यरात्री पोलीस स्थानकात का दाखल झाले होते?, जर खरंच सुनील टिंगरेंनी अजय तावरेंची शिफारस केली होती. मग टिंगरेंनी त्यातून वॉकआऊट करण्याचा प्रयत्न का केला? होय, मी शिफारस केली होती, असं टिंगरे ठामपणे का सांगितले नाही?, शिफारस पत्र व्हायरल झाल्यानंतर त्यावर खुलासा करण्याची गरज आणि वेळ टिंगरेंवर का आली?, असे अनेक सवाल सुषमा अंधारे यांनी यावेळी उपस्थित केले.
निकालानंतर धक्कादायक खुलासे करणार-
4 जूनला निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन. पण तोवर डॉ अजय तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी वाटते, असं सुषामा अंधारे म्हणाल्या.
अजय तावरेंसाठी सुनील टिंगरेची शिफारस-
अजय तावरेंसाठी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून 2023 मध्ये शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी, अशा आशयाचे पत्र सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिले होते.
अग्रवाल पिता-पुत्रांकडून कायद्याची ऐशीतैशी-
बड्या बापाच्या लेकाला वाचवण्यासाठी पोलिसांपासून ते शासकीय रुग्णालयातील प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागल्याचं आता पोलिस (Police) तपासातून समोर आलंय. मात्र, पोलिसांवर दबाव टाकून राजकीय नेतेमंडळीही याप्रकरणात हस्तक्षेप करत होते. त्यातच, अपघाताच्या दिवशी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यामुळे, राजकीय दबाव आणि पैशांच्या जोरावर अग्रवाल पिता-पुत्रांकडून कायद्याची ऐशीतैशी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, माध्यमव समाज माध्यमांच्या दबावानंतर आता पोलीस तपास वेगाने सुरू आहे.