छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन नेते मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना छत्रपती संभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar)  शहरात समोर आली आहे. काल रात्री साडेअकराच्या सुमारास तब्बल दोनशे ते अडीचशे जणांच्या जमावाने घरातून बाहेर काढत या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. दीपक बद्री नागरे असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. 


मारहाण करण्यात आलेला तरुण दीपक हा दुपारी मनोज जरांगे यांची भेट घेऊन परत आला होता. त्यानंतर त्याने जरांगे यांच्यासोबचा सेल्फी स्टेटसला ठेवताना एका ओळीचा आक्षेपार्ह मजकूर लिहल्याचा आरोप होत आहे. तर त्याच्या स्टेटसचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर जमावाने मुकुंदवाडी भागात राहत असलेल्या दीपक नागरेचं घर गाठत त्याला मारहाण केली आहे. तर वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्या दीपक विरोधात मुकुंदवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आले आहे. 


आक्षेपार्ह पोस्ट असल्यामुळे 200 ते 250 जणांचा जमाव 


सोशल मीडियावरती मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर पसरली आहे.  मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट असल्यामुळे मुकुंदवाडी परिसरामध्ये 200 ते 250 जणांचा जमाव जमा झाला होता. त्यानंतर  संतप्त नागरिकांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाच्या घराची शोधाशोध सुरू झाली.


तरुणाविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल


 मुकुंदवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या तरुणाला शोधून काढत त्याला घरातून बाहेर काढत मारहाण केली. यावेळी त्याला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलं. या प्रकरणी नवनाथ डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक नागरे या तरुणाविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे करीत आहेत.


6 जूनपर्यंत आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी


4 जूनला अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही. 6 जूनपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा खूप मोठं आंदोलन होईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिला आहे. ठरल्याप्रमाणे आम्हाला 6 जून पर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा हे आंदोलन खूप मोठे होईल. ठरल्याप्रमाणे आम्हाला 6 जून पर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा हे आंदोलन खूप मोठे होईल, असंही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.