मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपून आता निकालासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची झाल्यामुळे निकाल काय लागणार, याबाबत सध्या सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही मनात धाकधूक आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात अवघ्या चार-पाच महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वी भाजपला (BJP) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे (Raj Thackeray) आता भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. 


राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये येत्या 26 जूनला निवडणूक होत आहे. यामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरे यांना आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून सध्या भाजपचे निरंजन डावखरे आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपला असला तरी भाजपकडून त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र, मनसेनेही कोकण पदवीधर मतदारसंघात  उमेदवार उतरवल्याने भाजपची गोची झाली आहे. राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांना उमेदवारी देणे, हा भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे. 



कोकण पदवीधर मतदारसंघातील यापूर्वीची स्थिती?


कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजप आणि शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. 2012 मध्ये निरंजन डावखरे यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर 2018 साली डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी  डावखरे यांना पुन्हा याच मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत निरंजन डावखरे यांनी शिवसेनेच्या संजय मोरे यांचा पराभव केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्लाही रिंगणात होते. परंतु, निरंजन डावखरे यांनी सहजपणे विजय मिळवला होता. तेव्हापासून निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. या काळात त्यांनी कोकणातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये जनसंपर्काचे जाळे विणले आहे. 


मनसेचा प्लॅन काय?


लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांच्या भूमिकेत महत्त्वाचा बदल होताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसेंना उमेदवारी देऊन आपले राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांना राज ठाकरे यांचा भरपूर मानपान केला होता. त्यामुळे आता कोकण पदवीधर मतदारसंघात एकतर भाजपला मनसेच्या भाजपच्या अभिजीत पानसे यांना पाठिंबा द्यावा लागेल. त्यासाठी निरंजन डावखरे यांची उमेदवारी मागे घ्यायची वेळ आली तर काय भूमिका मांडायची, याबाबत भाजपच्या गोटात खल सुरु आहे. यापूर्वी भाजपच्या नेत्यांना राज ठाकरे यांची समजूत काढता येईल का, हे पाहावे लागेल. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहतील. 


आणखी वाचा


कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अभिजीत पानसेंनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट; महायुतीचा पाठिंबा?, चर्चांना उधाण