पालघर : जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील आसे येथील आत्महत्याग्रस्त वेठबिगारी, आदिवासी शेतमजूर कालू यांच्या कुटुंबियांची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज सांत्वनपर भेट घेतली. ही घटना अतिशय गंभीर असून या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा प्रश्न धसास लावल्याशिवाय राहणार नाही. तसेच या आदिवासी कुटुंबाची घरकुल योजनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा. त्यांच्या मुलांना आदिवासी आश्रम शाळेत दाखल करुन घ्या. खावटी योजनेचा लाभ या आदिवासी कुटुंबाला लवकर मिळवून द्या, अशा सुचना दरेकर यांना उपस्थित प्रांत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आदिवासी कातकरी शेतमजुराचा वेठबिगारीच्या पाशात अडकून बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा या दुर्गम तालुक्यात एका मजुराला त्याच्या मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी करण्याची वेळ ओढवली होती. काळू पवार असे या दुर्दैवी कातकरी शेतमजुराचे नाव आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तातडीने या आदिवासी गावाला भेट दिली. या आदिवासी कुटुंबाला भाजपच्या वतीने तातडीची आर्थिक मदत देण्यात आली असून त्यांना अन्न-धान्याच्या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत. याप्रसंगी भाजपच्या आमदार मनिषा चौधरी, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, तालुकाध्यक्ष संतोष सोते यांच्यासह प्रांत अधिकारी पोलिस अधिक्षक उपस्थित होते.


याप्रसंगी माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, आदिवासी पाड्यावरील घटना अतिशय विदारक आहे. ही घटना पाहून व या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आपण अस्वस्थ झाले. मन खरंच सुन्न झाले. कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी ही घटना आहे. घटना घडल्यानंतर 20 दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना ही घटना घडूनही 20 दिवस झाले तरी त्यांना माहित नाही. हे दुर्दैव आहे. पोलिस पाटीलांनीही या घटनेची माहिती दिली नाही. कुठल्या दबावाखाली येथील यंत्रणा काम करित आहे या आधी शोध घेतला पाहिजे. येथीला यंत्रणेचे हे सपशेल अपयश असल्याची टीका दरेकर यांनी केली.


त्या आदिवासी महिलेला अद्यापही घर मिळालेले नाही. घरकुल योजना व पंतप्रधान आवास योजनामधूनही या आदिवासी महिलेला घर मिळत नसेल तर या योजनांचा काय फायदा असा सवाल करतानाच दरेकर म्हणाले की, ठाणेपासून काही तासाच्या अंतरावरील आदिवासी गावातील हे विदारक चित्र पाहावयास मिळाले. या दुरावस्थेला येथील शासकीय यंत्रणा जबाबदार आहे. या आदिवासी महिलेप्रमाणे आज अनेक आदिवासी महिला घरकुल योजनेपासून वंचित राहिल्या आहेत. या आदिवासींसाठी काम करण्याची आवश्यकता आहे. त्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहितीही कोणत्याही यंत्रणेने घेतलेली दिसत नाही. कफनासाठी 500 रु मागितले. पण त्या आदिवासीला गडी म्हणून ठेवले व त्याने आत्महत्या केली हे गंभीर आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून हा विषय नक्कीच धसास लावल्याशिवाय राहणार नाही. असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.


निष्पाप आदिवासी व कातकरी बांधवांवर अन्याय होत असेल तर हे गंभीर आहे. सरकार म्हणून यांना न्याय मिळाला पाहिजे. प्रांत अधिकारी यांना सूचना देऊन त्या आदिवासी कुटुंबाची घरकुल योजनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा. त्यांच्या मुलांना आदिवासी आश्रम शाळेत दाखल करुन घ्या. खावटी योजनेचा लाभ या आदिवासी कुटुंबाला लवकर मिळवून देण्याच्या सूचना उपस्थित शासकीय यंत्रणेला दरेकर यांनी दिल्या.