नांदेड : अशोक चव्हाणांच्या नवीन कार्यकर्त्यांना वाटलं जुने कार्यकर्ते काम करतील, जुन्यांना वाटलं ही नवीन कार्यकर्ते पक्षात आले ते काम करतील, या गैरसमजातून नांदेड शहरात कमी मतदान झालं आणि आपला पराभव झाला असं भाजपचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर (Prataprao Chikhalikar) यांनी म्हटलं. औकात नसणाऱ्यांना पक्षाने मोठं केलं, त्यांनी पक्षाशी गद्दारी केली असं सांगत त्यांना सोडणार नसल्याचा इशाराही चिखलीकरांनी दिला. नाव न घेता दिलेल्या इशाऱ्यानंतर चिखलीकरांचा रोख नेमका कुणाकडे होता याची चर्चा मात्र नांदेडमध्ये जोरात रंगल्याचं दिसून येतंय. 


लोकसभा निवडणुकीत भाजपचे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांचा पराभव झाला. त्यानंतर बिलोली येथील आभार सभेत बोलताना चिखलीकर म्हणाले की, "आपल्या पराभवाची कारणं खूप वेगळी आहेत. आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं. अशोक चव्हाणांनी पक्षप्रवेश केला, त्यानंतर नांदेडची जागा आपण दोन लाखांच्या मताधिक्याने जिंकू असं म्हटलं गेलं. त्यानंतर अशोक चव्हाणांना राज्यसभेवर घेतलं. त्यानंतर ही लीड आणखी वाढेल असं वाटलं. पण नगरपालिका आणि महानगरपालिकेतील जुन्या टीमला वाटू लागलं की अशोक चव्हाणांसोबत आलेले लोक आता आपल्या उरावर बसतील. मग आपण काम करून काय फायदा नाही. म्हणून त्यांनी काम केलं नाही. तर दुसरीकडे नव्याने पक्षात आलेल्या लोकांनी वेगळा विचार केला. त्यांना वाटलं असेल आपण नवीन आहोत, काम करून काही फायदा होणार नाही. त्यामुळे आपल्याला पराभव स्वीकारावा लागला."


गद्दारांना सोडणार नाही


प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, माझा कुणावरही राग नाही, मी कुणावरही राग व्यक्त करणार नाही. एक दोन लोक आहेत, त्यांना शेवटपर्यंत सोडणार नाही हेही सांगतो. त्यांची औकात नसताना पक्षाने त्यांना मोठं करण्याचं काम केलं. अशा लोकांनी पक्षासोबत गद्दारी करावी ही अत्यंत चुकीचं घडलं. 


नांदेडमध्ये प्रताप चिखलीकरांचा मोठा पराभव


अशोक चव्हांनी ऐन लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला रामराम केला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतलं आणि त्यानंतर भाजपला नांदेड आणि हिंगोली लोकसभा जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा संधी देण्यात आली तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाणांना संधी देण्यात आली. 


अशोक चव्हाणांचा पाठिंब्यामुळे भाजप नांदेडची जागा सहज जिंकेल अशी चर्चा असताना मतदारांनी मात्र वेगळाच निर्णय घेतल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी भाजपच्या प्रताप चिखलीकरांचा मोठा पराभव केला आणि अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस संपली नसल्याचा संदेश दिला. 


ही बातमी वाचा: