मुंबई : "जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस (Congress) आरक्षण (Reservation) संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही", असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) एका कार्यक्रमात केले. यावरून महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर भाजपचे (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर निशाणा साधला.  


प्रसाद लाड म्हणाले की, आरक्षणाच्या बाबतीत राहुल गांधींनी विदेशात संविधान आम्ही संपवणार अशी भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीत नरेटीव्ह सेट करण्याचं काम केलं. आज खऱ्या अर्थाने काँग्रेसची भूमिका राहुल गांधीजींच्या तोंडून स्पष्टपणे देशासमोर आणि जगासमोर आली. या माध्यमातून मनोज जरंगे पाटलांना माझा प्रश्न आहे की, मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना आरक्षणाबाबत विचारणार आहे का? महाविकास आघाडीचा बुरखा फाडणार आहात का? की पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा बुरखा घालून राहुल गांधींची साथ देणार आहात, असा हल्लाबोल त्यांनी केला.  


जरांगे पाटील राहुल गांधींच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार का?


ते पुढे म्हणाले की, आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने संघर्ष केला. मराठा आरक्षण दिलं. ते आरक्षण जर राहुल गांधी संपवणार असतील तर मनोज जरांगे पाटील राहुल गांधी यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार का? आणि ज्या देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले त्यांना शिव्या देणारे मनोज जरांगे पाटील आता हे म्हणतील का? की राहुल गांधी देखील देवेंद्र फडणवीस यांचाच माणूस आहे, असा सवालदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


राहुल गांधींचा बुरखा फाडा


मनोजजी हिंमत असेल तर पुढच्या दोन तासात पत्रकार परिषद घ्या. राहुल गांधींचा बुरखा फाडा तर आम्ही समजू तुम्ही खरे मराठा आरक्षणाचे आंदोलक आहात. खरे मराठ्यांचे नेते आहात. नाहीतर तुमचे भेगडे प्रेम आणि तुमचं मराठ्यांना फसवण्याचे उद्दिष्ट आज जनतेसमोर येईल, असे आव्हान प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहे. आता जरांगे पाटील यावर काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींचा खरा चेहरा पुढे आला, भाजप कधीही आरक्षण संपू देणार नाही : देवेंद्र फडणवीस