नांदगाव, नाशिक : ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या काळजात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कट्यार खुपसली असं टीकास्त्र मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सोडलं. ते नाशिक जिल्ह्यातील नांदगावात (Nandgaon) बोलत होते. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना दिलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. 


मनसे नेते प्रकाश महाजन यांनी या निकालानंतर शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. प्रकाश महाजन म्हणाले, "आयुष्यभर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पवार साहेबांच्या काळजात, आज निवडणूक आयोगाच्या निकालाने अजित पवारांनी कट्यार घुसवली. शरद पवारांचे उभे आयुष्य हे दुसऱ्याची घरे फोडण्यात गेले. आम्ही स्वत:ही त्याचे शिकार आहोत. गोपीनाथरावांचे घर फोडतांना शरद पवारांच्या हे लक्षात आले नाही की भविष्यात हा प्रयोग त्यांच्याही बाबतीत होऊ शकतो"


काकांचा पक्ष हिसकावणं सोपं (Prakash Mahajan on Sharad Pawar)


दरम्यान, एकीकडे प्रकाश महाजन यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं असताना, तिकडे मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अजित पवारांवर निशाणा साधला. मनसेने ट्विट करुन म्हटलंय, "बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्पं आहे. पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी 'राज ठाकरे' यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते... असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ!".    


शरद पवार गटाकडून चिन्हाची चाचपणी (Sharad Pawar Party symbol)


निवडणूक आयोगाने धक्का दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गट आक्रमक झाला आहे. पवार गट आता सुप्रीम कोर्टात लढाई लढणार आहे. पण त्याआधी पवार गटाकडून नवे नाव आणि चिन्हासाठी चाचपणी सुरु झाली आहे. शरद  पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद स्वाभिमानी पक्ष या नावांचा पर्याय सध्या चाचपून पाहिला जातोय. तर कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरू आहे. 


निवडणूक आयोगाचा निर्णय काय?  (Election commission decision)


केंद्रीय निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाचा निर्णय जाहीर केला. पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला दिलं आहे, तर शरद पवार गटाला (Sharad Pawar) स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय घेताना काही महत्त्वाचे मुद्दे तपासले, त्याचसोबत दोन्ही गटाकडून देण्यात आलेले कागदपत्रांची तपासणीही केली. 


VIDEO : प्रकाश महाजन नेमकं काय म्हणाले?



 संबंधित बातम्या 


NCP Crisis : सूर्यफूल, चष्मा ते उगवता सूर्य, शरद पवार गटाकडून नव्या चिन्हांची चाचपणी, कोणतं चिन्ह फायनल होणार?