मुंबई : काँग्रेसमध्ये (Congress)  बंडखोरी करून मैदानात उभे ठाकलेले विशाल पाटील (Vishal Patil)  यांना पाठिंबा  मिळत आहे.  महाविकास आघाडीतील काँग्रेस नेत्यांचा दबाव झुगारत विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचा आपला निर्णय कायम ठेवला आहे.  यामुळे सांगलीत आता बहुरंगी लढत होत असली तरी खरी लढत महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष अशी तिरंगी होत आहे.आता  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar)  विशाल पाटील (Vishal Patil) यांना वंचितचा पाठिंबा जाहीर केला आहे. विशाल पाटील हे सांगलीत अपक्ष म्हणून रिंगणातून उतरल्यास आपण त्यांना पाठिंबा देऊ, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. 


विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी शेंडगेंना दिलेला पाठिंबा काढण्यात आला आहे.  विशाल पाटील अपक्ष उभं राहण्याचा विचार करत असताना त्यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची अकोल्यात  भेट घेतली होती. यावेळी पाठिंब्यासंदर्भात बोलणी झाली होती  प्रकाश शेडंगे उभे राहत असल्याने सांगलीतून वंचितनं शेंडगेंना पाठिंबा देऊ केल्याने  तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा असं त्यावेळी आंबेडकरांकडून पाटील यांना सांगण्यात आलं होतं . त्यामुळे प्रतिक पाटील यांनी मुंबईत येत प्रकाश शेंडगेंची देखील भेट घेतली होती . दरम्यान, अकोल्यातून ओबीसी बहुजन पार्टीनं प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता.  दुसरा टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर आता सांगलीसंदर्भात वंचितनं भूमिका घेत विशाल पाटील यांना थेट पाठिंबा जाहीर केला आहे.


काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?


महाविकास आघाडीशी फारकत घेतल्यानंतर  सांगलीतून वंचितने प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला होता.  ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे स्वत: सांगलीतून निवडणूक लढवत आहेत. प्रकाश शेंडगेंनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा जाहीर केला होता. मात्र प्रकाश आंबेडकर आणि प्रतिक पाटील यांची भेट झाली त्यावेळी त्यांनी पाठिंबा देण्याविषयी वक्तव्य केले होते.  आंबेडकर म्हणाले होते,  प्रतीक पाटील माझ्याकडे आले होते, काय करायचं विचारत होते. मी त्यांना म्हणालो की, हिंमत असेल, तर लढा. तुम्ही लढलात तर आम्ही तुम्हाला पाठींबा देतो. ते लढले, तर पाठिंबाही देऊ आणि निवडून आणू. 


चार जूनला वंचितची नेमकी ताकद किती हे समजणार?


 पाठिंब्याबद्दल बोलायचं तर वंचितकडून सहा ठिकाणी इतर पक्षातील उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. कोल्हापुरातून काँग्रेस उमेदवार शाहू महाराजांना तर नागपुरातून विकास ठाकरेंना पाठिंबा  देण्यात आला आहे.  बारामतीतून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा  देण्यात आलेला आहे. यवतमाळ वाशिममधून अनिल राठोड यांना पाठिंबा दिलाय तर अमरावतीत आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देण्यात आलाय.  दरम्यान अकोल्यात स्वत: प्रकाश आंबेडकरांसह राज्यातील इतर उमेदवारांसाठीही वंचित बहुजन आघाडी आक्रमकपणे मैदानात उतरलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळं आता चार जूनला वंचितची नेमकी ताकद कितीय हे स्पष्ट होणार आहे. 


Video: