चंद्रपूर : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्यात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र मा.सा. कन्नमवार यांची आज 125वी जयंती आहे. या 125व्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूरला येणार आहेत.
विशेष म्हणजे चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि स्वागताध्यक्ष आहेत आणि या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आजी माजी खासदार-आमदार यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमाला भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मुनगंटीवार यांच्या समर्थकांच्या मते सुधीर मुनगंटीवार यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत प्रमुख पाहुण्यांच्या यादीत टाकण्यात आलं आहे. तर दुसरीकडे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष पद देण्यात आलेलं आहे. तर माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. मुनगंटीवार समर्थकांच्या मते हा त्यांना डावलण्याचाच प्रयत्न आहे. त्यामुळे मुनगंटीवार आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता फार कमी आहे.
सुधीर मुनगंटीवारांच्या अनुपस्थितिवर आमदार किशोर जोरगेवारांची प्रतिक्रिया
राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांची आज 125 वी जयंती आहे. या निमित्त चंद्रपुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार नाही. त्यांच्या या अनुपस्थितीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जोरगेवार यांच्या मते या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या यादीत सुधीर मुनगंटीवार यांना स्थान देण्याचा निर्णय हा आयोजन समितीचा आहे. आयोजन समितीनेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद विजय वडेट्टीवार यांना दिलं आहे. त्यामुळे कुणाला अध्यक्ष करावं आणि कोणाला प्रमुख पाहुणे करावं याबाबतचा निर्णय सर्वस्वी आयोजन समितीचा होता. मात्र स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना फोनवर संपर्क केला, मात्र मुनगंटीवार यांनी त्यांचा फोन रिसीव केला नसल्याची ही माहिती देखील जोरगेवार यांनी दिली आहे.
हे ही वाचा