रामायण..  हा काळ होता 1988-89 चा. त्या काळी दूरदर्शनवर रामायण लागायचं. ही मालिका टीव्हीवर आली की रस्ते ओस पडायचे. दुकानं ही मालिका झाल्यानंतर उघडायची असं बोललं जातं. तो काळ आजच्या पिढीने पाहिला नाही. पण गेली आणि त्याही आधीची पिढी रामायण मालिकेवेळच्या गोष्टी सांगत होती. दूरदर्शनवरची ही मालिका तुफान गाजली. 80 चं दशक या मालिकेन गाजवलंच. पण या मालिकेचं गारूड अजूनही भारतातल्या जनतेवर आहे हे दाखवून दिलं ते 2020 मधल्या लॉकडाऊनने. ही मालिका लॉकडाऊन काळात दूरदर्शनने आपल्या पोतडीतून काढली आणि संपूर्ण देश नॉस्टॅल्जियात बुडाला. पुन्हा एकदा प्रभू श्रीराम, हनुमान, लक्ष्मण, सीता, रावण आदी व्यक्तिरेखा टीव्हीवर दिसल्या. या त्याच व्यक्तिरेखा होत्या ज्यांच्यावर तमाम भारताने साधारण 30 वर्षापूर्वी भरभरूप प्रेम केलं होतं.


या लॉकडाऊनने पुन्हा एकदा रामाची भूमिका करणारे अरूण गोविल प्रकाशात आले. रामायण पहिल्यांदा लागलं तेव्हा गोविल यांना लोकप्रियता मिळाली होतीच. पण त्यावेळी सोशल मीडिया किंवा चॅनल्स नव्हती. त्यामुळे ती लोकप्रियता इतरांपर्यंत पोचत नव्हती. किंवा इतरांना त्यांच्याशी कनेक्ट होता येत नव्हतं. आता 2020 मध्ये ही मालिका आली आणि अरूण गोविल पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रगटले. कधी नव्हे इतका त्यांचा फॅनफॉलोइंग वाढला. रामायणातल्या श्रीरामाच्या व्यक्तिरेखेची पकड आजही त्यांच्यावर दिसते. लोक आजही त्यांच्यात प्रभू रामाला शोधतात. 


गोविल यांची लोकप्रियता आणि जनमानसात घट्ट रुजलेली त्यांची प्रभू श्रीरामाची प्रतिमा हेरून आता भारतीय जनता पक्षाने त्यांना आपल्या पक्षात घेतलं आहे. गोविल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. दूरदर्शनवरच्या रामायणातला राम आता भाजपमध्ये आला असला तरी भाजपने रामायणातल्या याच व्यक्तिमत्वांना राजकारणात ओढल्याचं इतिहास सांगतो. एकिकडे भाजपने श्रीरामाच्या मंदिराची उभारणी आयोध्येत हाती घेतली आहे. दुसरीकडे रामाची प्रतिमा लाभलेले अरूण गोविलही आता भाजपमध्ये आले आहेत. त्यांच्या या लोकप्रियतेचा फायदा पक्षाने करून घेतला नाही तरच नवल. 


असं असलं तरी भाजपने नेहमीच पौराणिक मालिकांमध्ये गाजलेल्या कलाकाराांना आपल्या ताफ्यात सामावून घेतलं आहे. टीव्हीवरच्या रामायणातले राम आता आता भाजपमध्ये आले असले तरी याआधी सीता, रावण, हनुमान यांनाही भाजपने रेड कार्पेट अंथरलं होतं. रामायण येऊन गेल्यानंतर भाजपने लगेच सीता वठवलेल्या दीपिका यांना बडोद्यामधून खासदारकी दिली. ते साल होतं 1991. पुढे रामायणात रावणाची भूमिका साकारलेले अरविंद त्रिवेदी यांनाही भाजपने लोकसभेवर पाठवलं. अशा रीतीने सीता आणि रावण यांनी राजकारण प्रवेश केला. इतकंच नव्हे, तर 1998 मध्ये याच रामायणात हनुमानाची भूमिका साकारून अजरामर झालेले अभिनेते, मल्ल दारासिंगही भाजपमध्ये गेले. पुढे 2003 मध्ये ते राज्यसभेवर खासदार म्हणून गेले. 


अशा रीतीने खूप आधीच रामायणातल्या रावण, सीता, हनुमान यांनी भाजपमध्ये जायला पसंती दिली. आता एकिकडे आयोध्येत राममंदिराच्या उभारणीचं काम जोरावर आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालमधल्या निवडणुकांचं वातावरण तापू लागलं आहे. भाजपला पौराणिक मालिकांमध्ये गाजलेल्या व्यक्तिरेखांना सोबत घ्यायची हौस फार जुनी आहे. म्हणूनच महाभारतात द्रौपदी साकारलेल्या रुपा गांगुली यांनाही त्यांनी तिकीट देऊ केलं होतं. अर्थात ती त्या तिकीटावर गांगुलीजी पडल्या हा भाग वेगळा. आता प्रभू रामाच्या रुपाने मनामनांत विसावलेले अरुण गोविल केवळ भाजपमध्ये प्रवेश करुन थांबतात की राज्यसभा वा  लोकसभेवर जातात ते यथावकाश कळेलच.