मुंबई: आमच्यावर टीका करणारे हे नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी आहे, खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी ही एनडीए सोबत असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. जे लोक आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार अशा टोला मोदी यांनी पवार-ठाकरेंना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एबीपी माझा'ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी पवार -ठाकरेंवर टीका केली. 


पक्ष फुटले म्हणून लोकांना भावनिक करतात


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटकोपरमध्ये रोड शो केला. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फोडले असा आरोप केला जातोय, त्यावर नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. नरेंद्र मोदी म्हणाले की, नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी हे आमच्या विरोधात आहेत. खरे पक्ष आमच्यासोबत आहेत. हे जर म्हणत असतील की त्यांचे पक्ष फुटले, तर मग जे त्यांचे पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार? उद्धव ठाकरे हे शिवसेना फुटली म्हणून रडत बसतात, लोकांना भावनिक करतात. बाळासाहेबांचा मुलगा हा मर्दाचा मुलगा असायला हवा, पण त्यांच्या कुटुंबात कलह असल्याने त्यांचा पक्ष फुटला. 


देशवासीयांना विश्वास


नरेंद्र मोदी म्हणाले की, 2014 मध्ये देश निराशेच्या गर्तेतून बाहेर पडला आणि आज घोडदौड सुरू आहे. येत्या काळात देश हा जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार, 20247 पर्यंत हा देश विकसित देश असेल हा सर्वांना विश्वास आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या कामामुळे लोक आता चांगलं जाणतात, काय चांगलं आणि काय वाईट याची लोकांना प्रचिती आली आहे. माझं पूर्ण जीवन हे देशवासीयांना समर्पित आहे, त्यामुळे मला यातून उत्साह मिळतोय. भारतीय जनता पक्षाला 400 पार नेण्याचं लोकांची इच्छा असल्याने आम्ही पु्न्हा सत्तेत येऊ. 


माझं आयुष्य हे देशासाठी समर्पित 


आपलं आयुष्य हे देशासाठी समर्पित असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. ते म्हणाले की, या 140 कोटी लोकांच्या देशात कुणाला ना कुणाला काही अध्यात्मिक इच्छा होते, गंगा स्नान करावं किंवा चार धामची यात्रा  करावी. पण या लोकांना त्या त्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मी प्रयत्न करत आहे. धार्मिक ठिकाणांच्या विकासामुळे त्या त्या ठिकाणची अर्थव्यवस्था बदलते.


संविधान बदलणार का? 


भाजप जर सत्तेत आलं तर संविधान बदलणार असा आरोप केला जातोय. त्यावर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या 23 वर्षांपासून मी राज्यात आणि देशात सत्तेत आहे. पण विरोधी पक्षाला देशाला विभाजित करण्याचं नियोजन करत आहेत. त्यामुळेच त्यांनी ही अफवा पसरवली आहे. 


ही बातमी वाचा: