Ambadas Danve on Narendra Modi Meeting, Mumbai : राज्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून लोकसभा निवडणुकीसाठी काही ठिकाणी प्रचार सुरु आहे. तर काही ठिकाणी मतदान पार पडले आहे. "लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता जाहिर करण्यात आलेली आहे. असं असताना प्रभारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या डागडूजीची कामे करण्यात येत असून स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. एकप्रकारे हा निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करुन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर नियमांनुसार उचित कारवाई करावी", अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. दानवेंनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे.


देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्याप्रमाणे राज्यात सर्वत्र राजकीय पक्षांकडून त्यांचे पालन करुन नेत्यांच्या सभा सुरु असून चौथ्या टप्यातील प्रचाराची कामे सुरु आहेत. परंतु देशाचे पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी अनेक ठिकाणी या आचारसंहितेचा भंग करुन मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या डागडुजीची कामे करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी मोदींजी सभा होते, त्याठिकाणी रस्त्यांच्या डागडूजी केली जात असल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे. 


सभेच्या ठिकाणापर्यंतच्या रस्त्याची डागडूजी व स्वच्छतेची कामे 


दानवे म्हणाले, स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठया प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी मोदी येणार असल्याने विमानतळापासून ते सभेच्या ठिकाणापर्यंतच्या रस्त्याची डागडूजी व स्वच्छतेची कामे कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात आली आहेत. वास्तविक पाहता इतर वेळी देशाचे पंतप्रधान किंवा इतर राजकीय महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींच्या दौऱ्याच्यावेळी अशी कामे करण्यात येत असतात. 


अधिकाऱ्यांवर नियमांनुसार उचित कारवाई करण्याची मागणी


परंतु लोकसभेच्या निवडणुकीसाठी देशात आदर्श आचारसंहिता सुरु असताना नरेंद्र मोदी यांच्या बैठकांच्या स्थळी जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी शासकीय यंत्रणेचा वापर करुन कामे करण्यात येत आहेत.  एक प्रकारे हा निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करुन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर नियमांनुसार उचित कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी मुख्य निवडणुक आयुक्त यांच्याकडे केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Hitendra Thakur : बाप का राज है क्या? औकात है, तो इज्जत से लढो; हितेंद्र ठाकूरांचा नेमका कोणाला इशारा?