बीड : लोकसभा निवडणुकीत यंदा बीड लोकसभा मतदारसंघासह मराठवाड्यात आश्चर्यकारक निकाल लागला. बीडमध्ये (Beed) अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत निकालाची उत्सुकता शेवटच्या 32 व्या फेरीपर्यंत ताणल्याचं दिसून आलं. अखेर या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांना 6 हजार मतांनी विजयी घोषित करण्यात आलं. त्यानंतर, सोनवणे समर्थकांनी एकच जल्लोष केला. मात्र, येथील निवडणुकीत प्रथमच जातीय रंग पाहायला मिळाला. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष प्रचारादरम्यान जाणवला. तर, बजरंग सोनवणे यांनी निवडणुकीनंतर उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील यांची भेट घेऊन त्यांचे आभारही मानले आहेत. दरम्यान, निवडणूक निकालानंतर पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) पराभवामुळे येथे तणाव निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.  
 
बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या वादग्रस्त पोस्ट फिरत आहेत. त्यावर पोलिसांनी कारवाई केली असली तरी या संदर्भात सुरुवातीला पाथर्डी शहर बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर, आज बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहर बंद ठेवण्यात आलं होतं. आता, उद्या परळी शहर बंद ठेवण्याचा निर्णय वंजारी समाजाच्यावतीने घेण्यात आला आहे. परळी शहरातील नागरिकांनी आज पोलीस स्टेशनमध्ये एकत्र येऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये जे लोक वादग्रस्त पोस्ट करत आहेत, त्यांना पायबंद घालण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. 


दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय सचिव व बीड लोकसभा भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल निवडणूक निकालानंतर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. तर, मुंडे समर्थकांनी बीड जिल्ह्यातील पाथर्डी व शिरुर बंदची हाक दिली होती. त्यास, प्रतिसाद देत पाथर्डी व शिरुर बंद ठेवण्यात आले होते. आता, परळी बंदची हाक देण्यात आली आहे. 


जालन्यात गुन्हा दाखल


जालना येथे पंकजा मुंडे यांच्या विरोधात वॉट्सअपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून बदनामी केल्याप्रकरणी एका तरुणा विरोधात सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंठा तालुक्यातील सरकटे वझर येथे राहणाऱ्या तरुणाने भावना दुखावतील असे आपल्या वॉट्सअपवर स्टेटस ठेवल्याने त्याच्या विरोधात आलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काय आहे वाद


बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का बसला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला. परळीमध्ये पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांची आघाडी मिळाली. बीडमधील परळी हा भाजपचा बालेकिल्ला मानले जाते, या मतदारसंघात धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर ताकद वाढली होती. बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली. तर, या मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा फटका बसला. अत्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत निकाल जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. आरोपीने फेसबुकवर काही कार्यकर्ते नाचत असलेला एक व्हिडीओही पोस्ट केला. तसेच व्हिडीओखाली आक्षेपार्ह पोस्ट देखील लिहिली होती.