Beed : आगामी लोकसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना पाठिंबा देणार का? याबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भाष्य केलं आहे. "जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझे बंधू धनंजय त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि आमचा भारतीय जनता पक्ष यांची राज्यामध्ये युती आहे. त्यामुळे नॅचरली जिल्ह्यामध्ये एकत्र आहोत. त्यांचा पक्ष युतीत आल्यानंतर माझ्या मतदारसंघावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होत. त्यानंतर आता मला लोकसभा उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या येण्यामुळे जेवढ्या मतांनी प्रीतम ताई निवडून येत होत्या. त्यापेक्षा जास्त मतांनी मी निवडून यावे, यासाठी त्यांचे नक्कीच योगदान मिळेल", असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे (Pankaja Munde) यांनी बीडमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
नव्या झोनमध्ये जात असल्यामुळे मनात हूरहूर नक्कीच आहे
पंकजा मुंडे म्हणाल्या, नव्या झोनमध्ये जात असल्यामुळे मनात हूरहूर नक्कीच आहे. पण नवीन अनुभव आहे आणि नवीन अनुभवासाठी आम्ही नेहमीच तयार असतो. लोकसभा निवडणुकीसाठीच्या भाजपच्या उमेदवार यादीत माझे नाव असेल अशी मला अपेक्षा होती, कारण बऱ्याच दिवसांपासून त्याबाबत चर्चा सुरु होत्या. यादीत नाव आल्याने मला फार धक्का बसला असं नाही, कारण बरेच दिवस यांची चर्चा सुरु होती. मात्र, पक्षाकडून जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते, असेही मुंडे (Pankaja Munde) यांनी स्पष्ट केले.
आमच्या दोघींमध्ये चांगले कॉम्बिनेशन होते
पुढे बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, प्रीतम ताई मुंडे साहेब गेल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे करियर सोडून राजकारणात आल्या. 10 वर्ष संपूर्ण त्यांनी राजकारणात वाहून घेतले. आमच्या दोघींचे कॉम्बिनेशन खूप छान होतं. ज्या गोष्टी मी वेळेअभावी करु शकत नव्हते, त्या बाबींची जबाबदारी प्रीतम ताई घेत होत्या. धोरणात्मक निर्णय मी करायचे. त्यामुळे आमच्या दोघींमध्ये चांगले कॉम्बिनेशन होते. भविष्यातही हेच कॉम्बिनेशन राहिलं.
प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही
प्रीतमताई खासदार असताना मी 5 वर्षे घरी देखील बसले आहे, आम्हाला तोही अनुभव आहे. प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही. गेल्या 10 वर्षात अनेक राज्यसभा आणि विधानपरिषदेसाठी माझे नाव चर्चेत आले. पण तेव्हीही मी हेच म्हणत होते की, हे माझ्या हातात नाही. राजकारण हा एक फार मोठा खडतर प्रवास आहे. तो कायम असतो. बीड जिल्ह्याची जनता काय करेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. पुढील प्रवास कसा असेल याबाबत मलाही उत्सुकता आहे. कारण प्रीतमताईंनी लोकसभा लढवली, तेव्हाही आम्ही प्रचंड संघर्ष केलाय. माझ्या निवडणुकीबाबत तर तुम्हाला सर्व माहिती आहे. या निवडणुकीत काय परिस्थिती निर्माण होते, हे पाहाण्यासाठी मी देखील उत्सुक आहे, असेही पंकजा मुंडे (Pankaja Munde) यावेळी बोलताना म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या