पालघर :  पालघर लोकसभेसाठी (Palghar Lok Sabha Election)  विद्यमान खासदार राजेंद्र गावितांना (Rajendra Gavit) उमेदवारी नाकराल्यामुळे त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवलीय... दिल्लीसह राज्यातून सातत्यानं उमेदवारी देण्याचं आश्वासन देण्यात आलं.  दरम्यान आज  डॉक्टर हेमंत सावरा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत मात्र महायुतीच्या रॅलीकडे राजेंद्र गावित यांनी पाठ फिरवलीय.  


पालघर लोकसभेसाठी महायुतीकडून आज भाजपचे हेमंत सावरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून महायुती कडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं असलं तरीही या रॅलीत नाराजी नाट्य पाहायला मिळालं . शिवसेना शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांचे तिकीट कापल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत रॅली सोडत पालघरमधून जव्हारचा मार्ग पकडला . त्यामुळे गावितांची नाराजी दूर करण्यात महायुतीच्या वरिष्ठांना अपयश आल्याचे पाहायला मिळालं . 


आश्वासन दिलं मात्र उमेदवारी दिली नाही, गावित नाराज


पाचव्या टप्प्याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून कालपर्यंत महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती . पालघर लोकसभा  भाजपकडे गेल्याने शिवसेना शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांना भाजपमध्ये आयात करून त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली होती . मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही तास शिल्लक असताना भाजपकडून भाजपचे दिवंगत माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. 


गावितांचे राज्यात योग्य पुनर्वसन केलं जाईल: रवींद्र चव्हाण


 खासदार गावित हे नाराज झाले असून महायुतीच्या पार्लमेंटरी बोर्डात गावित यांनाच उमेदवारी देण्याचा ठरलं असताना देखील आपलं तिकीट का कापलं हे अजूनही आपल्याला समजल नसल्याचं सांगत गावित यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली .  रात्रीच राजेंद्र गावित यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढल्याचं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं असून त्यांचं राज्यात योग्य पुनर्वसन केलं जाईल असा आश्वासन यावेळी रवींद्र चव्हाण यांनी दिला. 


गावितांची नाराजी महायुतीला परवडण्यासारखी नाही


राजेंद्र गावित यांनी आपण नाराज असलो तरी महायुती सोबतच राहणार असा दावा केला आहे . मात्र असं असलं तरी गावितांची नाराजी ही पालघर लोकसभेत महायुतीला परवडण्यासारखी नाही . त्यामुळे येत्या काळात ही गावितांची नाराजी वरिष्ठ दूर करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हे ही वाचा :


Palghar Lok Sabha constituency : पालघरमध्ये सेनेचा पत्ता कट, शिंदेंना दे धक्का, भाजपने जागा खेचली, हेमंत सावरा यांना उमेदवारी