Maharashtra Assembly Session: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विधानसभेत गुरुवारी उत्तर देणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनुसार गुरुवारी उत्तर देणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 


विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर पेनड्राइव्ह बॉम्ब फोडल्यानंतर आज बुधवारी विधीमंडळात सरकार कोणती भूमिका घेणार आहे, याकडे लक्ष लागले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात उपस्थित राहणार नसल्याचे कळवले होते. त्यांच्या विनंतीनुसार गुरुवारी निवदेन सादर करणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. 


देवेंद्र फडणवीस यांचे आरोप काय?


राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा घणाघाती आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात खळबळ उडवून दिली. विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला.


गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यापासून ते बरंच काही या कार्यालयात ठरलं. एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचं काम सरकारी वकिलांनी केलं. साक्षी कशा घ्यायच्या त्यापासून पैसे कसे घ्यायचे याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओत असल्याचे त्यांनी म्हटले. 


काय आहे प्रकरण?


जळगावमधील निभोरा पोलीस ठाण्यात याबाबत प्रथम फिर्याद नोंदविण्यात आली होती. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त अॅड. विजय पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मात्र कोथरूड परिसरात ही घटना घडल्यामुळे फिर्याद तिकडे वर्ग करण्यात आली. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार ट्रस्टची कागदपत्रे घेण्यासाठी तक्रारदाराला पुण्यात बोलविण्यात आले होते. मात्र तिथे त्यांना प्रथम एका हॉटेलमध्ये आणि नंतर एका फ्लॅटमध्ये नेण्यात आले. त्यानंतर काही लोकांनी, "गिरीशभाऊंना ट्रस्टवर ताबा हवा, म्हणून तुम्ही आता राजीनामा द्या", अशी धमकी दिल्याचं पोलीस तक्रारीमध्ये पाटील यांनी म्हटलेलं आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Budget Session: फडणवीसांनी वाचलेल्या भाषणातील शब्द अन् शब्द जशाच्या तसा; वाचा संपूर्ण भाषण