मुंबई :  लोकसभा निवडणुकांमध्ये देशात इंडिया आघाडीला व राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महाविकास आघाडीने जवळपास 30 जागांवर विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यामध्ये, भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील भाजपचे नेते व केंद्रीयमंत्री कपिल पाटील, मंत्री भारती पवार, यांसारख्या दिग्गजांना पराभवाचा फटका बसला आहे. तर, मंत्री रावसाहेब दानवे हेही पिछाडीवर आहेत. मात्र, राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेतलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे मुंबई उत्तरचे उमेदवार पियुष गोयल यांचा पहिला नंबर लागतो. त्यामुळे, धाराशिवमध्ये पहिल्या फेरीपासून मताधिक्य घेणारे ओमराजे निंबाळकर हे दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.

  


3 लाख 16 हजारांचा लीड घेणारे ओमराजे सर्वाधिक मताधिक्य घेणारे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरू शकतील. कारण, ओमराजे निंबाळकर यांच्यापेक्षा पियुष गोयल यांचं मताधिक्य अधिक आहे. अर्थात, अंतिम आकडेवारी येणे बाकी आहे.  उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल यांनी सर्वात मोठा विजय मिळवला आहे. ते महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य घेणारे भाजपचे उमेदवार ठरले आहेत. गोयल यांना सायंकाळी 6 वाजेपर्यंत 3 लाख 52 हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे, तेच राज्यातील नंबर 1 मताधिक्य घेणारे खासदार ठरू शकतील.  


ओमराजे निंबाळकरांचं मताधिक्य


थेट जनतेशी संपर्क असलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातीलम महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आत्तापर्यंत हाती आलेल्या निवडणूक निकालांत मोठी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. खासदार निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना तब्बल 3 लाख 16 हजार मतांनी पिछाडीवर टाकलं आहे, अद्यापही मतदारसंघात 2 फेऱ्या  बाकी आहेत. त्यामुळे,  राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य घेतलेले खासदार बनण्याचा मान ओमराजेंना मिळू शकतो. 


प्रतिभा धानोरकर


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात  सायंकाळी 6 पर्यंत झालेल्या  मतमोजणीनंतर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर 2 लाख 50 हजार 726 मतांनी आघाडीवर आहेत. प्रतिभा धानोरकरांच्या विरोधात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार उभे होते. 


श्रीकांत शिंदे


ठाणे लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे लागलं होतं. कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हेही जवळपास निश्चित झाला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांना 2 लाख 47 हजार 564 मतांचं मताधिक्य असल्याचे दिसून येते


नरेश म्हस्के


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे नगरीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्यात थेट लढत झाली. त्यामध्ये, सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठाणे लोकसभेचे शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी 2 लाख 14 हजार मतांचा लीड घेतला आहे. 


गोवाल पाडवी


महाविकास आघाडीचा पहिला विजय जवळपास निश्चित नंदुरबारमधून निश्चित झाला. येथील गोवाल पाडवी यांनी तब्बल 1 लाख 59 हजार मतांचे मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. 


संजय जाधव


परभणीत महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी असून संजय जाधव यांनी 1 लाख 21 हजार मतांनी आघाडीवर आहे. तर, महादेव जानकरांचा पराभव निश्चित मानला जात असून अधिकृत निकाल येण्यासाठी थोडा विलंब होईल. 


राजाभाऊ वाजे


नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट) राजाभाऊ वाजेंनीही लाखांच्यावर मताधिक्य घेतलं आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत राजाभाऊ वाजे यांनी 1 लाख 9 हजार 639 मतांचं मताधिक्य घेतलं आहे.