NOTA : अबकी बार मतदारांची पसंद 'नोटा'? लोकसभा निवडणुकीत नोटाचे मतदान वाढण्याची शक्यता
Lok Sabha Election : गेल्या निवडणुकीवेळी 4 लाख 88 हजारांहून अधिक मतदारांनी उमेदवारापेक्षा 'नोटा'चा पर्याय निवडला होता. या वर्षीही लोकसभा निवडणुकीत 'नोटा'चा वापर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम (Lok Sabha Election) जाहीर झाला असून राजकीय पक्षांमधील राजकारणाला गती आल्याचं दिसून येतंय. मात्र प्रत्यक्षात या सोहळ्याचा महत्त्वाचा दुवा आहे, त्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत नाही. सर्वसामान्य नागरिक हे राजकारणाला कंटाळल्याचं दिसतंय. मागील काही निवडणुकांमध्ये पाहिलं तर 'नोटा'चे (NOTA) मतदान मोठ्या प्रमाणात झालंय. त्यामुळे यंदादेखील अनेक पक्षांनी दिलेले नापसंत उमेदवार आणि राज्यातील राजकारण याला कंटाळून लोक नोटाला मतदान अधिक करण्याची शक्यता आहे.
देशातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. प्रत्येक पक्ष मतदाराला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये फोडाफोडीचं राजकारण, आरोप प्रत्यारोप अशा प्रकारचं सध्या राजकारण सुरू आहे. या सर्व राजकारणाला प्रत्यक्षात सर्वसामान्य मतदार हा कंटाळलेला पाहायला मिळतोय.
राज्यभरात अनेक ठिकाणी काही पक्षांनी जे उमेदवार दिलेले आहेत ते सर्वसामान्य नागरिकांना पसंत नाहीत, तर दुसरीकडे राजकीय पक्षांच्या राजकारणाला सर्वसामान्य नागरिक कंटाळल्याचा पाहायला मिळतायत. सर्वसामान्य मतदारांनी आपली वेगळी मतं तयार केलेली आहेत.
'नोटा'चे मत वाढण्याची शक्यता
सध्याचे फोडाफोडीचे- कूटनीतीचे राजकारण आणि खालच्या पातळीवरील आरोप - प्रत्यारोप पाहिल्यावर अनेक मतदारांमध्ये मतदानाबाबत नाराजी निर्माण होत आहे. त्यात मागील दोन लोकसभा निवडणुकांपासून ईव्हीएम मशीनवरील नोटाच्या बटणाचा वापर वाढत चालल्याचे दिसून येते. मागील वर्षी 4 लाख 88 हजारांहून अधिक मतदारांनी उमेदवाराला निवडण्यापेक्षा 'नोटा'चा पर्याय निवडला होता. या वर्षीही लोकसभा निवडणुकीत 'नोटा'चा वापर वाढेल, असे निवडणूक कार्यालयातील जाणकार सांगतात.
'नोटा' मुळे उमेदवार नाकारण्याचा अधिकार मतदारांना मिळाला आहे. निवडणूक आयोगाकडील लोकसभा निवडणुकीची मागील दोन वर्षांची आकडेवारी पाहिली तर प्रचीती येते की, लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये 'नोटा'चा वापर वाढला आहे . 2019 मधील लोकसभा निवडणुकीतील 48 मतदारसंघांत तब्बल 4 लाख 88 हजार 766 मतदारांनी 'नोटा'चा वापर केला होता.
गेल्या लोकसभेची आकडेवारी काय सांगते?
- 2019 लोकसभा निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार शहरी भागातील मतदारांपेक्षा ग्रामीण भागातील मतदारांनी 'नोटा'चा वापर अधिक.
- 2019 मधील लोकसभा निवडणुकीत पालघरमधील मतदारांनी सर्वाधिक 'नोटा'चा वापर केला होता.
- या मतदारसंघातील 29 हजार 479 मतदारांनी 'नोटा' चे बटण दाबले होते.
- तर 2019 मधील लोकसभा निवडणुकीत गडचिरोली -चिमूरमधील 24 हजार 488 मतदारांनी 'नोटा'च्या पर्यायाला पसंती.
2019 ला राज्यात चार टप्प्यांत लोकसभेसाठी मतदान झाले.
- मतांचे गणित पाहिले तर राज्यात भाजपला 27.76 टक्के (1 कोटी 49 लाखांहून अधिक) मते मिळाली.
शिवसेनेला 23.3 टक्के (1 कोटी 25 लाख 89 हजारांहून अधिक) मते मिळाली.
- त्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसला 16.3 टक्के (87 लाख 92 हजारांहून अधिक), तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15.5 टक्के (83 लाख 87 हजारांहून अधिक) मते मिळाली.
- इतरांना 14.6 टक्के (78 लाख 65 हजारांहून अधिक) आणि ‘नोटा’ला (4 लाख 88 हजारांहून अधिक) मतदान झाले आहे.
- नुकत्याच झालेल्या अंधेरी पोट निवडणुकीत देखील नोटाला दुसऱ्या क्रमांकाची साडेआठ हजार अधिक मत होती.
राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांत सुमारे पाच लाख मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली होती. मात्र मागील निवडणुकीच्या काळात राज्यातील राजकारण आता जसं आहे तसं नव्हतं. मात्र सध्याच्या राजकारणाला सर्वसामान्य नागरिक कंटाळलेले आहेत. अपक्षासह कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराला आपले मत देण्याचे सध्याचे मानसिकता दिसत नाही . ही मतदाराची सर्वपक्षीय नाराजी राजकीय पक्षांना धोक्याचा इशारा असल्याचे मानले जाते. त्यामुळेच यंदाही नोटा मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा: