North West Mumbai Lok Sabha Constituency : मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा (North West Mumbai Lok Sabha Constituency) तिढा अद्याप कायम आहे. काँग्रेस (Congress) नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'नंतर (Bharat Jodo Nyay Yatra) आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे.


उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि ठाकरे गट (Thackeray Group) अशा दोघांकडूनही दावा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार  हे शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) असतील असं जाहीर केलं होतं. ठाकरेंच्या घोषणेनंतर काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) नाराज असल्याचं पाहायला मिळालं होतं. 


ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटात गेलेले विद्यमान खासदान गजानन किर्तीकरांचे पुत्र अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ठाकरेंच्या निर्णयाबाबत ट्वीट करत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासूनच संजय निरुपम यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अशातच काही दिवसांपूर्वी संजय निरुपमांनी नुकत्याच काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांची भेट घेतली. तेव्हापासूनच संजय निरुपमही भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. 


उत्तर पश्चिम मुंबईचा तिढा कधी सुटणार? 


आता या संदर्भात निरुपम यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनासुद्धा आपल्या उमेदवारी संदर्भात स्पष्टता द्यावी, असं म्हणत अमोल किर्तीकर यांच्या उमेदवारी संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारे महाविकास आघाडीतील संबंध खराब होऊ नये, यासाठी संजय निरुपम यांनी संयमची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी या लोकसभा मतदारसंघात उमेदवार हे अमोल किर्तीकरच असतील, अस स्पष्ट केलं आहे. संजय निरुपम यांना उमेदवारी हवी असेल, तर त्यांनी महायुतीत जावं, अशा प्रकारचं वक्तव्य माध्यमांशी बोलताना अनिल परब केलं होतं. 


दरम्यान, काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याकडून उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. संजय निरुपम राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्यायात्रेनंतर या सगळ्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करतील, त्यांचा काँग्रेस पक्ष श्रेष्ठींशी यासंदर्भात बोलणी सुरू असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे संजय निरुपम नेमकी कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. याशिवाय आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीतसुद्धा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात यासंदर्भात चर्चा होणार आहे.