North Maharashtra Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) राज्यात अखेरच्या पाचव्या टप्प्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या प्रचाराची सांगता होणार आहे. आज प्रचार सांगता होणार असल्याने राजकीय सभांचा धडाका उत्तर महाराष्ट्रामध्ये रंगणार आहे. 


उत्तर महाराष्ट्रामध्ये दिग्गज नेत्यांच्या राजकीय सभा


आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. आजच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा येत आहेत. मालेगावमध्ये महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. दुसरीकडे शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ अमोल कोल्हे यांची सभा होणार आहे.


 दुसरीकडे नाशिक लोकसभेसाठी सुद्धा रामदास आठवले सभा घेणार आहेत. सकाळी 11 वाजता त्यांची सभा होणार आहे. वंचितचे उमेदवार कारण गायकर यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची सुद्धा सकाळी 11 वाजता सभा होणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची सभा होणार आहे. त्यामुळे आज उत्तर महाराष्ट्रामध्ये दिग्गज नेत्यांच्या राजकीय सभा होणार आहेत. 


छगन भुजबळ नाशिकमध्ये पूर्ण ताकदीने सक्रिय दिसणार का?


 गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभेची जागा सुद्धा चांगलीच चर्चेत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मातब्बर नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांची काल भेट घेत त्यांची नाराजी दूर केल्याची चर्चा आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यामध्ये छगन भुजबळ नाशिकमध्ये पूर्ण ताकदीने सक्रिय दिसणार का? याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे.


नाशिक मधून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला छगन भुजबळ यांनी विरोध केला होता. ते स्वतः निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना विविध कारणे सांगून निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला करण्यात आल्याने त्यांनी स्वतःच निवडणुकीत माघार घेतली होती. मात्र, त्यानंतर भुजबळ नाराज असल्याची चर्चा सर्वाधिक रंगली आहे.  


दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी चांगलेच चव्हाण निर्माण केलं आहे. या मतदारसंघांमध्ये कांदा हा सर्वात संवेदनशील मुद्दा झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटले. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये भास्कर भगरे विरुद्ध भारती पवार असा तगडा सामना रंगला आहे. भारती पवार यांना कांदा उत्पादकांच्या नाराजीचा फटका बसणार का? याची सुद्धा चर्चा रंगली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या