Congress Steering Committee : काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) सूत्रं हाती घेतल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचा पहिलाच दिवस वेगवान घडामोडींचा राहिला. अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीच्या (Congress Working Committee) नव्या रचनेसाठी सर्व सदस्यांचे राजीनामे झाले. त्यानंतर तात्पुरती व्यवस्था म्हणून पक्षाच्या घटनेप्रमाणे सुकाणू समितीची रचना जाहीर झाली. पाठोपाठ गुजरात निवडणुकीच्या तिकीट वाटपासाठी स्क्रीनिंग कमिटीची बैठक झाली आणि लगोलग 29 नोव्हेंबरला खर्गेंचा पहिला दौरा गुजरातमध्ये असणार हेही जाहीर झालं.
स्क्रीनिंग कमिटीच्या रचनेत या मुद्द्यांची चर्चा
- अध्यक्षपदासाठी निवडणूक झाल्यानंतर आता काँग्रेस वर्किंग कमिटीवरच्या सदस्यांची पण निवडणूक व्हावी ही मागणी आहे.
- त्या दृष्टीनं ही वर्किंग कमिटी बरखास्त करत तोपर्यंत पक्षाचे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी 47 जणांची सुकाणू समिती खरगेंनी जाहीर केली
- शशी थरुर आधी वर्किंग कमिटीत नव्हते, पण या कमिटीत त्यांना समाविष्ट करून सर्वसमावेशकता खरगेंना दाखवता आली असती
- वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य, कायम आमंत्रित सदस्य नव्या समितीत कायम आहेत, अपवाद फक्त विवेक बन्सल यांचा. ते हरियाणाचे प्रभारी आहेत, इथं राज्यसभा निवडणुकीत पक्षाला दगाफटका झाला होता
- वर्किंग कमिटीत विशेष आमंत्रित असलेला एकही सदस्य सुकाणू समितीत घेतला गेला नाहीय, त्यामुळे दीपेंदर हुड्डा, सचिन राव या नेत्यांसह युथ काँग्रेस अध्यक्ष, महिला काँग्रेस अध्यक्ष, एनएसयूआय अध्यक्ष सगळेच या नव्या समितीत नाहीत.
काँग्रेस वर्किंग कमिटीची नवी रचना काँग्रेसच्या एका विशेष अधिवेशनात ठरण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी मार्च दरम्यान हे अधिवेशन होऊ शकतं. त्यात 25 पैकी 11 सदस्य निवडणुकीनं निवडले जातात का हे पाहावं लागेल. ही वर्किंग कमिटी बनेपर्यंत तूर्तास पक्षाचे महत्वाचे निर्णय सध्याची सुकाणू समितीच घेणार आहे.
वर्किंग कमिटीत 11 सदस्य निवडून आलेले, 12 अध्यक्षांनी निवडलेले, एक अध्यक्ष, एक संसदीय पक्षाचा नेता असे एकूण 25 सदस्य असतात. सध्या सुकाणू समितीत तर सोनिया, राहुल, प्रियंका असे गांधी कुटुंबाचे तीनही सदस्य कायम ठेवले आहेत. नव्या वर्किंग कमिटीत काय होतं याची उत्सुकता असेल.
मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झाल्यानंतर आता गुजरातच्या प्रचारासाठी बाहेर पडत आहेत. राहुल गांधी आता गुजरातमध्ये किती प्रचार करणार हाही प्रश्न असेल. मोदी-शाहांच्या गुजरातचं पहिलंच कडवं आव्हान नव्या अध्यक्षांसमोर आहे. खर्गेंनी काम करायला सुरुवात तर केली आहे, पण गांधी घराण्याच्या प्रभावातून बाहेर ते किती पडतात याचीही उत्सुकता असेल.