Mallikarjun Kharge: काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जिकल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''काँग्रेस अध्यपदाच्या निवडणुकीचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल मी पक्षाचे प्रतिनिधी, नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी या लोकशाही प्रक्रियेत भाग घेऊन काँग्रेसला बळकट केलं आहे.'' यावेळी बोलताना ते खासदार शशी थरूर यांच्याबद्दल म्हणाले आहेत की, माझे साथी शशी थरूर यांना मी शुभेच्छा देतो. कारण निवडणुकीत आम्ही दोघे प्रतिनिधी म्हणून उभे होतो. मात्र निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडली, असं ते म्हणाले आहेत. 


काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जिकल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांना शशी थरूर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबद्दल बोलताना खरगे म्हणाले की, ''शशी थरूर मला येऊन भेटले. त्यांची भेट घेऊन पक्षाला पुढे कसे न्यायचे यावर चर्चा केली.' 
 
मल्लिकार्जुन खर्गे पुढे म्हणाले की, सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी सोनिया गांधी यांचे आभार मानू इच्छितो. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केंद्रात दोनदा सरकार स्थापन केले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात काँग्रेसने या देशातील लोकशाही मजबूत केली असून संविधानाचे रक्षण केले आहे. आज लोकशाही धोक्यात आहे आणि संविधानावर हल्ला होत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकीने लोकशाही बळकट केली आहे.


ते म्हणाले की, आज महागाई गगनाला भिडली आहे. सरकारकडून देशात द्वेष पसरवला जात आहे. याविरोधात राहुल गांधी भारत जोडो यात्रेला निघाले आहेत. त्यांच्या संघर्षात देश सोबत उभा आहे. राहुल गांधी यांच्याशी संवाद झाल्यानंतर त्यांनी माझे अभिनंदन केले आणि मी काँग्रेसचा सैनिक म्हणून काम करत राहणार असल्याचे सांगितले. खरगे म्हणाले की, काँग्रेसमध्ये सर्व समान आहेत. आपण सर्वांनी कार्यकर्त्यांप्रमाणे काम करावे, पक्षात कोणीही लहान-मोठा नसतो. जातीयवादाच्या नावाखाली लोकशाही संस्थांवर हल्ला करणाऱ्या फॅसिस्ट शक्तींविरुद्ध आपल्याला एकजुटीने लढायचे आहे.


खरगे म्हणाले की, रस्त्यापासून संसदेपर्यंत सर्वांनाच लढावे लागणार आहे. गरीब कुटुंबात जन्मलेल्या कार्यकर्त्याला काँग्रेस अध्यक्ष बनवल्याबद्दल मी आभारी आहे. दरम्यान,  काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये मल्लिकार्जुन खरगे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. खरगे यांना 7897 मते मिळाली, तर शशी थरूर यांना केवळ 1072 मते मिळाली. मल्लिकार्जुन खरगे 26 ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारतील.