Ambadas Danve On Maharashtra Police: नवी मुंबईत आज पोलीसांच्या विरोधात ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलतांना ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला. तर आमच्या नादी लागल्यास सोडणार नाही असा इशाराही दानवे यांनी यावेळी पोलिसांना दिला. यावेळी आपल्या भाषणातून दानवे यांनी शिंदे गट आणि भाजपवर देखील निशाना साधला. संस्कृतीच्या खोट्या थापा मारणारा भारतीय जनता पक्ष अंधेरीत मैदान सोडून पळून गेल्याचा खोचक टोलाही दानवे यांनी यावेळी लगावला.
यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, आज फक्त नवी मुंबईचा मोर्चा आहे. पण या नवी मुंबईच्या मोर्चातून आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना इशारा देत आहोत की, आमच्या नादी लागल्यास आम्ही सोडणार नाही लक्षात ठेवा. कारण हा महाराष्ट्र छत्रपती यांच्या विचाराचा आहे. आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जन्मजात लढायला शिकवलं आहे.
तर निश्चित आपले पोलीस चांगले आहेत, मात्र मुंबईचा एक हरामखोर अधिकारी कुणाची तरी सुपारी घेऊन आमच्या लोकांना एन्काऊंटर करण्याच्या धमक्या देत आहे. त्यामुळे तुझ्यात दम आहे का? हरामखोरा एन्काऊंटर करण्याचा असं दानवे म्हणाले. तर इथे उपस्थित असणाऱ्या इतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला जाऊन सांगावे दम असेल तर ये या शिवसैनिकांसमोर आणि कर एन्काऊंटर दम असेल तर, असेही दानवे म्हणाले.
अंधेरीत मैदान सोडून पळाले...
भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. याचा अर्थ आपले टोले योग्य लागत असून, त्यामुळेच हल्ले होत आहे. मात्र अशा हल्ल्यांना आम्ही घाबरत नाही. एकीकडे सत्ताधारी पक्षाचे माजलेले आमदार बंदुकीतून गोळी मारतात, एकजण म्हणतो तुम्ही हातपाय तोड तुमची टेबल जामीन करतो, एकजण शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना भरदिवसा मारहाण करतो आणि त्याला वाय दर्जेची सुरक्षा मिळते. दुसरीकडे सर्वसामान्य शिवसैनिकांना तडीपार करण्याचा नोटिसा दिल्या जातायत, जनता आगामी निवडणुकीत तुम्हाला तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. असे हल्ले शिवसेनेवर यापूर्वी सुद्धा झाले असून, घाबरण्याची गरज नाही. शिवसेनेची ताकद आहे म्हणूनच अंधेरीच्या पोटनिवडणुकीत हे लोकं मैदान सोडून पळून गेले आहे. आता संस्कृतीच्या खोट्या थापा मारण्याचं काम सुरु असल्याचे दानवे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या...