नागपूरः महानगरपालिकेच्या (NMC Elections) निवडणुकीसाठी आरक्षित करण्यात आलेल्या 35 जागांमुळे माजी महापौर किशोर डोरले, कॉंग्रेसचे हरीश ग्वालवंशी, भाजपचे संदीप गवई यांना फटका बसला आहे. या माजी नगरसेवकांना आता दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. मागील 31 मे रोजी काढलेल्या आरक्षणात धोक्यात आलेले भाजपचे अॅड. संजय बालपांडे यांना मात्र आरक्षणाचा लाभ झाला आहे. महापालिकेतील इतर दिग्गजांचे भवितव्य मात्र त्यांना अनुकूल प्रभागात सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.
ओबीसी आरक्षणामुळे फटका बसलेले माजी महापौर किशोर डोरले यांनी प्रभाग 8 मधून लढण्याचे ठरविले होते. मागील आरक्षणानुसार त्यांना दिलासाही मिळाला होा. परंतु, ओबीसी आरक्षणामुळे त्यांच्या प्रभागात एक जागा अनुसूचित जमाती प्रवर्गाची आहे तर ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला असे आरक्षण आहे. त्यामुळे त्यांना आता या प्रभागाऐवजी दुसरीकडे लढण्यासाठी तयारी करावी लागणार आहे. ओबीसी आरक्षणाचा थेट फायदा भाजपचे अॅड. संजय बालपांडे यांना झाल्याचे दिसून येत आहे. मागील 31 मे रोजी काढलेल्या आरक्षणात त्यांना त्यांच्यासाठी अनुकूल प्रभाग 23 सोडून इतरत्र जावे लागणार होते. परंतु ओबीसी आरक्षणामुळे आता त्याना प्रभाग 23 सोडून इतरत्र भटकण्याची गरज नाही. याच प्रभागात माजी महापौर दयाशंकर तिवारीही सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून लढण्याची शक्यता आहे. प्रभाग 26 मधून माजी स्थायी समिती सभापती बाल्या बोरकर यांचाही खुल्या प्रवर्गातून मार्ग मोकळा आहे. त्यांच्याप्रमाणेच माजी महापौर संदीप जोशी, माजी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, भाजपचे बंटी कुकडे, पिंटू झलके, शिवसेनेचे किशोर कुमेरिया, कॉंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, संदीप सहारे, अरुण डवरे सुरक्षित आहेत.
ग्वालवंशी आणि गवई यांना फटका
परंतु कॉंग्रेसचे हरीष ग्वालवंशी यांना प्रभाग 20 मध्ये धक्का बसला आहे. त्यांच्या प्रभागातील एक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून दोन जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. याशिवाय भाजपचे संदीप गवई यांनाही फटका बसला तरी त्यांच्यासाठी प्रभाग 19, 34, 44 अनुकूल दिसून येत आहे. या प्रभागात अनुसूचित जाती प्रवर्गासाटी जागा राखीव आहे. मागील 2017 मधील मनपा निवडणूकीत पराभूत झालेले माजी स्थायी समिती सभापती बंडू राऊत यांच्यासाठी त्यांचे निवासी क्षेत्र असलेला प्रभाग 32 अनुकूल आहे. त्यांना उमेदवारीची अपेक्षा आहे. अविनाश ठाकरे यांच्यासाठी प्रभाग अनुकूल असला तरी शिंदे फडणवीस सरकार आल्याने विधानपरिषदेत त्यांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते मनपा निवडणूक लढणार की परिषदेला प्राधान्य देणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
कुमेरियांविरुद्ध कोण?
शिवसेनेचे किशोर कुमेरिया यांच्यासाठी प्रभाग 29 आणि 49, दोन्ही अनुकूल आहेत. प्रभाग 29 मध्ये ते सर्वसाधारण प्रवर्गातून लढण्याची शक्यता आहे. या प्रभागात त्यांच्यापुढे माजी परिवहन सभापती बंटी कुकडे यांचे आव्हान राहणार असल्याचे दिसून येते. प्रभाग 49 मधून सर्वसाधारण प्रवर्गातून लढल्यास येथे त्यांचे लढत माजी स्थायी समिती सभापती पिंटू झलके यांच्याशी होण्याची शक्यता आहे.
कार्यअहवालासाठी धडपड
उमेदवारी देण्यापूर्वी सर्वच पक्षांकडून इच्छुकांकडून केलेल्या कार्यालयाचा अहवाल मागविण्यात येत असतो. त्यामुळे सर्व इच्छुकांनी फोटो आणि माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कोरोनामुळे दोन वर्ष कुठलेही कार्यक्रम करण्यात न आल्याने आता अहवालात काय दाखवायचे असा प्रस्न इच्छुकांपुढे आहे.