Nitin Gadkari on Uddhav Thackeray, Majha Katta : "मागील काळात कारण नसताना काही गोष्टी पसरवण्यात आल्या. त्यातून आमच्याकडे या निवडणुकीची ऑफर वगैरे दिली. पण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. संघाचा स्वयंसेवक आहे. त्यामुळे माझा पक्ष, माझा विचार आणि संघटन हे मला सर्वपरी आहे. त्यामुळे माझा पक्ष सोडून दुसरीकडून उभे राहण्याचा प्रश्नच उरत नाही. ज्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या, त्यांना धन्यवाद.." काही आठवड्यांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आमच्याकडून लोकसभा निवडणूक लढवा, अशी ऑफर दिली होती. उद्धव ठाकरेंच्या या ऑफरला नितीन गडकरी यांनी माझा कट्टावर उत्तर दिलं आहे. 


महाराष्ट्रात अन्य तीन पक्ष सोबत आहेत


नितीन गडकरी म्हणाले, आमच्या पक्षात पार्लमेंटरी बोर्ड आहे. ते महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतात. त्यानंतर उमेदवारांची घोषणा होते. उत्तरप्रदेश मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यातील टीमबरोबर पार्लमेंटरी बोर्डाची चर्चा झाली. त्यामुळे तेथील उमेदवार जाहीर झाले. महाराष्ट्रात अन्य तीन पक्ष बरोबर आहेत. त्यांच्याशी चर्चा करणे आणि त्यांची मते पार्लमेंटरी बोर्डासमोर जाणे, याला उशीर झाला. त्यामुळे माझे नाव दुसऱ्या यादीत आले, असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं. 


पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत मी मोठ्या मार्जिनने विजयी होईल. गेल्या दहा वर्षातील आमच्या सरकारची कामगिरी आहे, ती आम्ही जनतेच्या न्यायालयात मांडणार आहोत. मला विश्वास आहे की, गेल्या 60-65 वर्षात काँग्रेसला संधी मिळाली. मात्र, काँग्रेला जे जमलं नाही ते आमच्या सरकारने करुन दाखवलं. त्या कामाच्या विश्वासावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत, असंही गडकरी यांनी नमूद केले. 


महाराष्ट्रातही आमच्या पक्षाला विजय मिळेल


आमच्या कामामुळे जनतेचे मोठे समर्थन मिळेल. मी प्रचंड मतांनी विजयी होईल आणि महाराष्ट्रातही आमच्या पक्षाला विजय मिळेल, असा मला विश्वास आहे. दरवर्षी माझी निवडणूक पक्ष लढतो. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षाच्या सिस्टिममध्ये आजवर काम केलं आहे. यावेळी मी एक सुधारणा केली आहे. निवडणुकीत उमेदवाराचे नाव माहिती व्हावे, यासाठी एक प्रोजेक्शन केले जाते. त्याचे कटआऊट्स, पोस्टर लावले जातात. मी नागपूरच्या जनतेला आपला परिवार मानतो. त्यामुळे माझ्या फोटोची किंवा कटआऊटची काही गरज नाही. मी रोज 500 ते 600 लोकांशी संवाद साधणार आहे. याशिवाय पदयात्रा काढणार आहे. शिवाय रात्री मी जाहीर सभा देखील करणार आहे. नागपूरवर माझे प्रेम आहे. तेथील लोकांचेही माझ्यावर प्रेम आहे, असेही गडकरी यावेळी बोलताना म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या 


Raj Thackeray: लोकसभेच्या तोंडावर भाजप-मनसे युतीच्या हालचाली; राज ठाकरे कसे गेमचेंजर ठरणार, दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण?