मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये लोकसभा जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. या जागावाटपाच्या चर्चेत आता अधिकृतरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. कारण, मंगळवारी संध्याकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित ठाकरे हे दोघेही जण चार्टर्ड विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. आज दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रशेखर बावनकुळे काहीवेळापूर्वीच दिल्लीला रवाना झाले होते. त्यांच्यापाठोपाठ आज राज ठाकरे दिल्लीकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण झाले आहे. राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह सचिन मोरे, हर्षल देशपांडे आणि राज ठाकरे यांचे एक स्नेही हे सर्वजण चार्टड विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत दाखल झाल्यावर राज ठाकरे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटण्याची शक्यता आहे. यावेळी महायुतीच्या कोट्यातून मनसेला एक किंवा दोन जागा सोडल्या जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून राज ठाकरे यांच्या पक्षासाठी दक्षिण मुंबईचा मतदारसंघ सोडला जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता दिल्लीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज ठाकरे थेट भाजप मुख्यालयात जाणार?
राज ठाकरे हे दिल्लीच्या दिशेने निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरे हे दिल्लीत उतरल्यानंतर थेट भाजपच्या मुख्यालयात जाऊ शकतात. याठिकाणी ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अमित शाह यांची भेट घेऊ शकतात. राज ठाकरे खरोखरच भाजप मुख्यालयात गेल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीने ही एक महत्त्वाची घटना असेल. आगामी राजकारणावर त्याचे दूरगामी परिणामी होऊ शकतात. परंतु, दुसऱ्या बाजुला राज ठाकरे हे अमित शाह यांच्या निवासस्थानी जाऊन बंद दाराआड चर्चा करु शकतात, असेही सांगितले जात आहे. राज ठाकरे ज्याअर्थी दिल्लीला रवाना झाले आहेत, ते पाहता भाजप नेतृत्त्वाकडून त्यांना ठोस आश्वासन देण्यात आल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दिल्लीत राज ठाकरे भाजपच्या नेत्यांना भेटल्यानंतर पुढे काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यापूर्वी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधात भूमिका घेतल्यामुळे भाजपला त्यांचे वावडे होते. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा अजेंडा हाती घेतल्यानंतर त्यांची आणि भाजपची जवळीक वाढली आहे. आतापर्यंत राज्यातील भाजपचे नेते राज ठाकरे यांच्या भेटी घेत होते. परंतु, त्यापलीकडे भाजप-मनसे युतीच्यादृष्टीने ठोस असे काही घडले नव्हते. परंतु, आज राज ठाकरे हे दिल्लीत गेल्याने भाजप-मनसे युतीला मूर्त रुप येण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा