Nitin Gadkari on New Politics of BJP : गेल्या वर्षात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फुटली. राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवार यांचा पक्ष देखील फुटला. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माझा कट्टावर प्रतिक्रिया दिली आहे. "मी व्यक्ती म्हणून नाही. तर मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. व्यक्तिगत भूमिकेतून निर्णय होत नाहीत. सामुहिक विचारातून निर्णय होतात. त्या निर्णयाशी मी सहमत आहे. आजही मी बाळासाहेबांबद्दल चांगलच बोलतो. युती बदलली पार्टी बदलली म्हणून आपले मतं बदलेले असं कधीही होत नाही. शरद पवारांशी मतभेद आहेत. त्यांचे आणि आमचे विचार वेगळे आहेत. काही विचारांबाबत सहमती देखील आहे. व्यक्तीगत संबंध चांगले असतात. ते जोपासले पाहिजेत, हेच वाजपेयी यांनी सांगितलं होतं" असं नितीन गडकरी म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत होते. 


पत्रकारांनी संभ्रम निर्माण करु नये, जे घडलं ते दाखवावं


नितीन गडकरी म्हणाले, राजकारणाच्या मर्यादा वेगळ्या आहेत. आघाडी मोडली म्हणजे मैत्री तुटली असं होत नाही. मात्र, याचा विपर्यास करणे आणि संभ्रम निर्माण करणे हा कदाचित मनोरंजनासाठी किंवा टीआरपीसाठी उपयोगी ठरेल. म्हणून काहीजण करत असतील. मी मनोहर जोशींना भेटायचो. राज ठाकरेंना भेटत असतो. उद्धव ठाकरेंशी कधी कधी भेट होते. शिवाय अनेक वर्ष मी शिवसेनेबरोबर काम केलं होतं. पत्रकारांनी संभ्रम निर्माण करु नये. जे घडलं ते दाखवावं. विश्वसनीयता जपावी. उलट तिलट लिहून सनसनाटी निर्माण करणे क्रेडिबिलीटीसाठी योग्य नाही, असेही गडकरी यांनी सांगितले. 


सत्ताकारण, पॉवर पॉलिटिक्स म्हणजे राजकारण नाही


पुढे बोलताना गडकरी म्हणाले, आज राजकारणाच स्तर असायला पाहिजे, तसा राहिलेला नाही. आपल्याला राजकारणाची व्याख्या रिडिफाईन केली पाहिजे. सत्ताकारण, पॉवर पॉलिटिक्स म्हणजे राजकारण नाही. राष्ट्रकारण, विकास कारण हे खर राजकारण आहे. त्यामुळे मी ठरवलंय वागताना गुणात्मक पद्धतीने वागले पाहिजे. कमरेखालचे वार मी करत नाही. वाजपेयी मला म्हणाले होते की, सभागृह बंद पाडूनच आपल्या भावना मांडता येतात असे नाही. योग्य भाषेत देखील आपल्याला भावना व्यक्त करता येऊ शकतात. आम्ही त्याकाळी फार आक्रमक होतो. आज लोकशाही त्याच स्तंभावर उभी आहे, असंही गडकरी यांनी नमूद केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


येत्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करतील का? नितीन गडकरींचे 'माझा कट्टा'वर रोखठोक उत्तर