सिंधुदुर्ग : कुडाळ नगरपंचायत पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला  मोठा धक्का बसला आहे. विद्यमान आमदार निलेश राणे यांनी महाविकास आघाडीचा एक नगरसेवक फोडत माजी आमदार वैभव यांना धक्का दिला आहे.  भाजपच्या प्राजक्ता बांदेकर 9 मिळवून नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीच्या सई काळप यांचा एका मतानं  पराभव झाला आहे. 


कुडाळमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला निलेश राणे यांचा धक्का देत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणला आहे. भाजपच्या प्राजक्ता बांदेकर शिरवळकर यांनी मविआच्या सई काळप यांना पराभूत केलं. निवडणुकीअगोदर मविआकडे 9 तर महायुतीकडे 8 नगरसेवक होते. मात्र, निलेश राणे यांना मविआचा एक नगरसेवक फोडण्यात यश आलं आणि  महायुतीचा नगराध्यक्ष निवडून आणाल.  


सिंधुदुर्गात आगामी काळात जिल्हा परिषद, नगरपालिकाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी कुडाळ ची नगराध्यक्ष पदाची निवडणूक नांदी ठरेल. पुढच्या सर्व निवडणुकात महायुतीच्या माध्यमातून आम्ही विजय मिळवू अशा प्रकारचा दावा आमदार निलेश राणे यांनी केला आहे. कुडाळ नगरपंचायतीतील नगराध्यक्ष निवडीनंतर निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह आनंदोत्सवात सहभाग घेतला होता. यानंतर बोलताना राणे म्हणाले,अडीच वर्ष कुडाळ शहराचा विकास रखडला होता आणि म्हणूनच इथला महविकास आघाडीचा एक नगरसेवक फुटला आहे. आता खऱ्या अर्थाने कुडाळचा विकास होईल. 


वैभव नाईक यांना दुसरा धक्का


नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला होता. निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश करुन निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत निलेश राणेंनी विजय मिळवला. त्यापाठोपाठ आता कुडाळच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मविआचा एक नगरसेवक फोडत निलेश राणेंनी वैभव नाईक यांना दुसरा धक्का दिला आहे. 


कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्के सुरुच


लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला कोकणात दोन्ही जागांवर पराभव स्वीकारावा लागला. रायगडमधून अनंत गिते पराभूत झाले. तर, रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक आणि राजन साळवी यांना पराभव स्वीकारावा लागला. वैभव नाईक यांना निलेश राणेंनी पराभूत केलं. तर, राजन साळवी यांना पराभूत करत किरण सामंत विजयी झाले होते. कोकणातून केवळ भास्कर जाधव विजयी झाले आहेत. 


दरम्यान, कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर निलेश राणे समर्थकांनी जल्लोष केला.



इतर बातम्या : 


Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...