अहमदनगर: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Election) महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि महायुतीचे (Mahayuti) उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती. शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी विखेंचा पराभव करत विजय मिळवला होता. अवघ्या 28 हजार मतांनी निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना धूळ चारत लोकसभेत विजय मिळाला होता. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची झाली होती. निवडणुकीनंतरही सुजय विखे पाटील आणि खासदार निलेश लंके यांच्यातील संघर्ष सुरूच राहील असा कायास कार्यकर्ते बांधत असतानाच अहमदनगरमध्ये एका सत्कार समारंभामध्ये नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.या पुढच्या काळात सहमतीचे राजकारण करणार असल्याचे संकेत निलेश लंके यांनी दिले आहेत.
निलेश लंकेंनी विखे कुटुंबियांवर स्तुतीसुमनं उधळलीत. यापुढे सहमतीचं राजकारण करणार असल्याचे संकेत लंकेंनी दिले आहेत. विशेष म्हणजे विखे कुटुंबियांचा आपल्याला अभिमान असून मी कुठेही गेलो तरी विखे कुटुंबीय आमच्या नगरचे असल्याचे सांगत असतो असंही लंकेंनी म्हटलंय. तर राधाकृष्ण विखे पाटील यांचे आशीर्वाद आपण घेणार असल्याचंही लंकेंनी म्हटलंय.
मतभेद विसरून आता सहमतीचे राजकारण करणार : निलेश लंके
निलेश लंके म्हणाले, विखे कुटुंबियांचा आपल्याला अभिमान असून मी कुठेही गेलो तरी विखे कुटुंबीय आमच्या नगरचे असल्याचे सांगत असतो. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आशीर्वाद आपण घेणार असून विविध विकास कामांसाठी आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आपल्याला जावे लागणार आहे. त्यामुळे सर्व मतभेद विसरून आता सहमतीचे राजकारण करणार आहे.
लहान माणसाने लहान माणसासारखे वागले पाहिजे: निलेश लंके
निलेश लंके म्हणाले, निवडणूक झाली आता मी त्यांच्याविरोधात टीका करणे योग्य नाही. झालं गेलं ते सोडून द्यायचे असते. विखे परिवार हा जिल्ह्यात मोठा आहे. सहकारामध्ये मोठे काम आहे. निवडणुकीमध्ये विरोधात बोलणे योग्य आहे. एखादा शब्द माझा घसरला एखादा त्यांचा गेला असेल पण जिल्ह्यात सहकारामध्ये मोठे नाव आहे. विरोधक आहे म्हणून कायमच विरोधात बोलायचे असं नसतं. माझे एखादे काम असेल तर मी त्यांच्याकडे जाऊ शकतो. असे राजकारण पाहिजे. मी त्यांच्याकडे मारक्या म्हशीसारखे बघायचं त्यांनी माझ्याकडे असे नाही पाहिजे. लहान माणसाने लहान माणसासारखे वागले पाहिजे. मी लवकरच त्यांचा आशीर्वाद घ्यायला जाणार आहे.