मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला. त्यातच, मनोज जरांगेंचा इम्पॅक्ट प्रामुख्याने मराठवाड्यात जाणवला असून महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे, आता विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानेही मनोज जरांगे यांनी तयारी दर्शवली आहे. सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे. खुद्द जरांगे यांनी एबीपी माझाशी बोलताना ही घोषणा केली. त्यानंतर, आता जरांगेंच्या भूमिकेवर ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. उपोषणकर्ते लक्ष्मण हाके (Laxaman Hake) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही पहिल्या टप्प्यात 24 मतदारसंघाची चाचपणी केली आहे. आम्ही शोध घेत आहे. आम्ही शांत का बसावे? कोणत्याही समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे. इतर समाजांनी देखील आमच्यासोबत आले पाहिजे, यासाठी चाचपणी करत आहे, असे जरांगे यांनी म्हटले. जरांगेंनी विधानसभेच्या दृष्टीने तयारी केली असून दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी मनोज जरागेंवर बोचरी टीका केली आहे. मनोज जरांगे हा भंपक माणूस असल्याचे हाके यांनी म्हटले. आंदोलनावर भाष्य करताना, सरकारला परिस्थिती माहिती आहे, कायदा व सुव्यवस्था पाळणे ही सरकारची जबाबदारी आहे. मी सर्वांना शाततेचं आवाहन करतोय, जनतेपर्यंत आवाज पोहोचतोय पण सरकारपर्यंत आवाज पोहोचत नाही का, असा सवाल लक्ष्मण हाकेंनी विचारला आहे.
कुणबी मराठा हे वेगळे
कुणबी आणि मराठा हे वेगळे आहेत. लिटरेचर बघितलं, बॅक हिस्ट्री बघितली, स्वरुप बघितलं, त्यांचे सोयरीक बघतली, त्यांचे देव-देवाक बघितले, आचार-विचार बघितले, रोटी-बेटी व्यवहार बघितले, तर कुणी आणि मराठा वेगळे आहेत. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना 2004 साली जो शासन निर्णय झाला, त्या जीआरने महाराष्ट्रातील ओबीसींचं आरक्षण संपुष्टात आणलं आहे, असेही हाके यांनी म्हटलं.
जरांगेंच्या निवडणूक निर्णयावर शेंडेगेंची प्रतिक्रिया
विधानसभा कुणी लढवावी कुणी नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, संविधानाने दिलेला तो अधिकार आहे. मात्र, मुद्दा हा आहे की मराठा समाजाला सरकारने 10 टक्के आरक्षण दिलं आहे. त्याची अंमलबजावणीही सरकारकडून करण्यात येत आहे. मराठा समाजाने ते 10 टक्के आरक्षण घेण्यास सुरुवातही केली आहे. दुसरं म्हणजे ईडब्लूएसच्या 10 टक्के आरक्षणापैकी 8.5 टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाने घेतला आहे. मनोज जरांगे यांनी मागणी ही आहे की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे, आता ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तर जरांगे म्हणतात आम्ही 288 जागांवर निवडणुका लढवणार, ह्याला पाडणार, त्याला पाडणार. मात्र, आमच्या मुलाबाळांच्या आरक्षणाचं भविष्य उध्वस्त करणारं असेल, तर आमचा समाज गप्प कसा बसेल का, असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी विचारला. तसेच, जरांगेंविरुद्ध आम्हीही उमेदवार उभे करू, राज्यातील 60 टक्के जाती ओबीसी आहेत, मुस्लीम व दलितांना सोबत घेतले तर आम्ही 80 टक्के होतो, असेही शेंडगे यांनी म्हटले. तसेच, मराठा समाज गरीब झाला तो आमच्यामुळे झाला का, असेही शेंडगे यांनी म्हटले.
हिंगोलीतून शेकडो समर्थक हाकेंच्या भेटीला
ओबीसी आरक्षण बचाव उद्देशान्वये जालन्यातील लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणाला ओबीसी बांधवांचा पाठिंबा वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हिंगोलीहून शेकडो गाड्यांचा ताफा आज ओबीसी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वडीगोद्री येथे दाखल होत आहेत. हिंगोली आणि वसमतमधील ओबीसी आंदोलन वडीगोद्रीच्या दिशेने आज रवाना होऊ लागलेली आहेत. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे, आज बीड हिंगोली छत्रपती संभाजी नगर आणि परभणी जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने ओबीसी आंदोलन वडीगोद्रीत पोहचले आहेत.