बीड : राज्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बीड (Beed) जिल्ह्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत होत आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार दिला आहे. मात्र, पंकजा विरुद्ध सोनवणे अशीच रंगतदार लढत असणार आहे. मराठा आरक्षणाचे (Maratha reservation) उपोषकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे सध्या बीड जिल्हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू बनला असून येथील मतदारसंघातील लढतीला जातीय रंग लागल्याचेही दिसून येत आहे. मंत्री धनजंय मुंडेंनी (Dhananjay Munde) बजरंग सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्रावरुन थेट टीका केल्यानंतर येथे कास्ट फॅक्टर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यातच, आता पंकजा मुंडेंसाठी बीडमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा होत आहे. त्यामुळे, मोदींच्या सभेपू्र्वीच बीड जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. 


भाजपाने बीड लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंचं तिकीट कापलं असून पंकजा मुंडेंना तेथून उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाचं स्वागत करुन पंकजा यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन बीड जिल्हा गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात चर्चेत आहे. त्यातच,अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. तर, बीड जिल्ह्यात त्यांचे सातत्याने दौरे होत असून मराठा समाजासाठी विविध ठिकाणी बैठकाही होत आहेत. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत बीडमध्ये जातीय रंग पाहायला मिळत आहे. जरांगे यांनी कोणाला पाडायचे त्याला पाडा, असे म्हणत मराठा समाजाला संकेत दिले आहेत. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत मराठा समाज काय भूमिका घेतो, हे पाहावे लागेल. 


10 मे रोजी बीडमध्ये सभा


पंकजा मुंडेंसाठी बीडमध्ये अद्याप कुठल्याही भाजपाच्या बड्या नेत्याने सभा घेतल्याचे दिसून येत नाही. मात्र, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बीडमध्ये प्रचारासाठी येत आहे. मोदींच्या बीडमधील प्रचारसभेचा मुहूर्त ठरला असून 10 मे रोजी नरेंद्र मोदींची येथे सभा होणार आहे. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात झंझावाती प्रचार सुरू केला असून पंकजा यांच्यासह हिना गावित व सुजय विखे पाटील यांच्यासाठीही नरेंद्र मोदींची जाहीर सभा होत आहे. त्यानुसार, नंदुरबार व अहमदनगरमध्ये 7 मे रोजी पंतप्रधानांच्या जाहीर सभा होत असून 10 मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा होत आहे.


मराठा समाजाच्या भूमिकेकडे लक्ष


मनोज जरांगे पाटील यांनी सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारदौऱ्यावरुन हल्लाबोल केला होता. मोदी साहेबांना इकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. मोदी साहेब शक्यतो स्वतःचं चिन्ह सोडून कधीच दुसऱ्याच्या प्रचाराला गेले नाहीत. मात्र, यंदा मराठा समाजाच्या एकीची भीती निर्माण झाली, इथंच मराठा जिंकला, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी मोदींवर निशाणा साधला होता. तसेच, प्रत्येक टप्प्यात मोदींना आणावे लागतंय. म्हणजे यांना मराठ्यांची प्रचंड भीती आहे, असेही जरांगे यांनी म्हटलं होतं. आता, मनोज जरागेंचं वास्तव्य असलेल्या बीडमध्ये मोदींची सभा होत असल्याने येथील मराठा समाज मोदींच्या सभेकडे कसं पाहतो, काय भूमिका घेतो, याची चर्चा होत आहे. 


संबंधित बातम्या


बीडमध्ये निवडणुकीला जातीय रंग, मराठा विरुद्ध ओबीसी कार्ड; अशी आहे जातनिहाय आकडेवारी