Neelam Gorhe मुंबई : शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत बोलताना दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी ‘इंपोर्टेड माल चालणार नाही’ असे विधान केले होतं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून महायुतीच्या नेत्यांकडून आता अरविंद सावंत यांच्या विरोधात सडकून टीका केली जात आहे.
दरम्यान, याच मुद्याला घेऊन शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अरविंद सावंत यांच्या विरोधात लेखी तक्रार करत निवडणूक आयोगाने महिलांचा अपमान करणाऱ्या विधानाबाबत तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
अरविंद सावंत महाराष्ट्रातील महिलांना मूर्ख समजतात का?
अरविंद सावंत हे महाराष्ट्रातील महिलांना मूर्ख समजत आहेत. त्यांनी स्त्रियांबाबत अपमानास्पद शब्द बोलला आहे. स्त्रियांबाबत अपमानास्पद शब्द खपवून घेणार नाही, तसेच सावंत यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तात्काळ लेखी तक्रार दाखल करणार असल्याचे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमीन पटेल यांचा प्रचार करत असताना अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांच्यावर अपमानास्पद शब्द उच्चारत टीका केली होती. त्याबाबत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलीय.
23 तारखेला जनता तुमचे हाल करेल- शायना एन सी
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तथा खासदार अरविंद सावंत यांनी शायना एन सी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा केला जातोय. यावरही शायना एन सी बोलल्या आहेत. एका महिलेला ते 'माल' म्हणून संबोधत आहेत.जो महिलांचा आदर करेल त्यालाच लोक निवडून देतील. आम्हीही अरविंद सावंत यांचा प्रचार केला होता, असे शायना एन सी म्हणाल्या.
तसेच, माझा माल असा उल्लेख केला तर जनता तुमचे 23 तारखेला हाल करेल. महिलांबाबत असं बोलणाऱ्या पक्षांची मानसिकता दिसून येतेय, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी अरविंद सावंतांची ऑडिओ क्लिप ऐकवली. तसेच 2014, 2019 सालच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने त्यांनी मतं मागितली होती, अशी टीका शायना एन सी यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या