मुंबई: आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षाबाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी बाबतीत राष्ट्रवादीसोबत आपले कधीच पटले नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलं आहे. त्यानंतर आता महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावरती आली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रतिक्रिया दिली आहे.
कॅबिनेटला अजित पवारांच्या (Ajit Pawar) मांडीला मांडी लावून बसावं लागतं व बाहेर आल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य केलं आहे शिंदे सरकारचे मंत्री तानाजी सावंत यांचं. सावंत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले " अजितदादांसारखा एक नेता अशा प्रकारचा अपमान कसं काय सहन करू शकतो हेच कळत नाही. सत्तेसाठी एवढी लालसा अजित दादांच्या मनात असावी हे कधी वाटलं नव्हतं. त्यांच्यातला स्वाभिमानी बाणा कुठे हरपला याचा शोध अजित दादांच्या (Ajit Pawar) पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे असा टोला महेश तपासे यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची झालेली पीछेहाट याला सर्वस्वी जबाबदार अजित पवार आहेत असा सूर आरएसएस व भाजपने खुलेआम उपस्थित करून अजित पवारांना जबाबदार ठरविले. त्यातच शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची अजितदादा विषयी भूमिका व त्यांना सरकारमध्ये सामील केल्याबाबतची नाराजी ही आता उघड उघड समोर येऊ लागलेली आहे. तपासे पुढे म्हणाले शरद पवारांच्या पक्षापासून फारकत घेत अजित पवार यांनी विकासाच्या साठी सत्तेमध्ये जात आहोत अशी घोषणा केली होती त्याला दुजोरा प्रफुल पटेल, छगन भुजबळ,सुनील तटकरे व आदी नेत्यांनी दिला होता. आता अजित दादांच्या अस्तित्वावरच घाला मंत्री तानाजी सावंत (Ajit Pawar) यांनी घातल्यानंतर अजित पवारांच्या पक्षातील हे सर्व नेते गप्प का असा सवाल महेश तपासे यांनी उपस्थित केला.
विधानसभेमध्ये महायुतीकडून 80 ते 90 जागा मिळवू अशी घोषणा श्री छगन भुजबळ यांनी केली होती आता 25 जागा मिळतील की नाही याचीही शाश्वती अजित दादांच्या राष्ट्रवादीला राहिली नाही आणि म्हणूनच त्यांना अशा प्रकारचा अपमान सहन करावा लागतो असेही तपासे म्हणाले. शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षांमध्ये अजितदादा असताना त्यांच्या बाजूला बसण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ असायची. त्याच अजितदादांच्या बाजूला बसून शिंदे सरकारच्या मंत्र्यांना उलट्या होतात हे अगदी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनातलं तानाजी सावंत बोलून गेले की काय असा सवाल तपासे यांनी उपस्थित केला.
वाघ असलेले अजितदादा अशा पध्दतीने वागतील असं कधी वाटलं नव्हतं...
अशातच तानाजी सावंत असं म्हणतात, आम्हाला कॅबिनेटच्या बैठकीत अजित पवारांसोबत (Ajit Pawar) बसावं लागतं. त्यानंतर बाहेर आल्यावर उलट्या होतात, असं त्यांनी जाहीर वक्तव्य केलं याचा अर्थ स्पष्ट आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांचा अपमान शिवसेना आणि भाजप करत आहे. एकेकाळी शरद पवारांसोबत अजित पवारांचा रूबाब होता. एक आकर्षण होतं शरद पवारांच्या पक्षांमध्ये, अजित पवार होते त्यावेळेस त्यांच्या शेजारी बसायला कार्यकर्त्यांची गर्दी असायची आता मात्र त्यांच्या शेजारी बसले की उलट्या होतात मळमळल्यासारखं होतं अशा प्रकारचे वक्तव्य तानाजी सावंत करतात आणि हे अजित पवार कसं सहन करतात हेच मुळात कळत नाहीये,अजित दादांचा हा स्वभाव हा मी कधीही पाहिला नव्हता, एक वाघ असलेले अजितदादा अशा पध्दतीने वागतील असं कधी वाटलं नव्हतं असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी म्हटलं आहे.
काय म्हणालेत तानाजी सावंत?
आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. आयुष्यात कधी आपले काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आज जरी कॅबिनेटमध्ये पटलेले नाही. राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, आपल्याला त्यांची अॅलर्जी आहे, असं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केल्याचं व्हायरल व्हिडिओतून समोर आलं आहे.
तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधतानाचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये ते म्हणतात, अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादीची आपल्याला अॅलर्जी आहे. पुडी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असंही सावंत म्हणालेत.
तानाजी सावंत यांच्या या व्हायरल क्लिपवरती उमेश पाटलांची प्रतिक्रिया
तानाजी सावंत (Tanaji Sawant) जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे. महायुती झाली म्हणून सावंत मंत्री झाले, हे त्यांनी विसरू नये असंही पाटील यांनी पुढं म्हटलं आहे.