मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने घवघवीत यश मिळवलं असून मोठ्या बहुसंख्येनं सरकार स्थापन केलं. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत केवळ 1 खासदार आलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील मोठं यश मिळालं. राष्ट्रवादीचे 40 पेक्षा जास्त आमदार निवडून आले. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला (NCP) विधानसभा निवडणुकीत म्हणावं तसं यश आलं नाही. शरद पवारांचे केवळ 10 आमदार विजयी झाले असून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव करत राजू खरे (Raju khare) निवडून आले. मात्र, राजू खरे निवडून आल्यापासून त्यांची जवळीक ही शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षासोबत दिसून येत आहे. तर, काही दिवसांपूर्वी अजित पवारांसोबतही त्यांच्या जाहिराती झळकल्या होत्या, त्यावरुन आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार राजू खरेंबाबत नाराजी असल्याचे समोर आलं आहे. 

Continues below advertisement


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी राजू खरे यांना देणे ही आमची चूक होती, असे म्हणत पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून त्या उमेदवारीबाबत माफी मागण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मोहोळ विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यानी देखील राजू खरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्या उमेदवारीबाबत माफी मागितली गेली. मागील काही दिवसांपासून सातत्याने राजू खरे पक्षविरोधी कृती करत असून त्यांच्याकडे आता पूर्णपणे पक्षाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली. आमदार राजू खरे सध्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा उघडपणे प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. त्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त करत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे, आता पक्षाकडूनच अशी प्रतिक्रिया आल्यानंतर आता राजू खरे काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. मात्र, राजू खरेंना दुसऱ्या पक्षात जायचं असल्यास पक्षांतर बंदी कायद्यानव्ये अगोदर आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. 


कोण आहेत राजू खरे?


आ. राजू खरे हे सोलापुरातील मोहोळचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत त्यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचा पराभव केला. मात्र, निवडणुका झाल्यानंतर काही दिवसांतच "मी नावालाच तुतारीवाला आहे, मला चुकून तुतारी हाती घ्यावी लागली", असं वक्तव्य राजू खरे यांनी केलं. इतकंच नाही, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यक्रमात सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदेंच्या अनेक कार्यक्रमात राजू खरे यांनी उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली. एवढचं नाही तर मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाचा मूहुर्त देखील काढला होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर राजू खरे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असं भरत गोगावले म्हणाले होते. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात राजू खरे यांनी अजित पवारांच्या पक्षासाठी वर्तमान पत्राच्या पहिल्या पानावर जाहिराती झळकवल्या आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे अभिनंदन केले आहे. त्यानंतर, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांच्याबद्दल नाराजीच सूर उघड झाला आहे. 


हेही वाचा


युवक घरात घुसला, सेल्फी काढत विनयभंग; शेतकऱ्याच्या अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन, सर्वत्र संताप