वाशिम : जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे, शेतकऱ्याच्या घरात एकटी मुलगी पाहून घरात घुसून तिच्यासोबत सेल्फी काढत तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच, लग्नाची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या युवकाच्या त्रासाला कंटाळून 11 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने चक्क विष प्राशन करत आपलं जीवन संपवल. अल्पवयीन तरुणीने विष (poison) प्राशन केल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वाशिमच्या (Washim) शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाघळूद गावात घडली आहे. याप्रकरणी, आरोपी फरार असून पोलिसांकडून (Police) तांत्रिक माहितीच्या आधारावर त्याचा शोध घेतला जात आहे.
एकतर्फी प्रेमातून घडलेल्या वाघळूद गावातील घटनेवरुन ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी टवाळखोर आरोपी अभिषेक देशमुख विरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अभिषेक देशमुख ह्या घटनेनंतर फरार झाला असून शिरपूर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेमुळे वाशिम जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मृत अल्पवयीन मुलीच्या पीडित कुटुंबातील सदस्यांनी आरोपीला तात्काळ अटक करुन आम्हाला न्याय देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, न्यायासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारू अशी भूमिका पीडितेचे नातेवाईक विलास आवटे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू
आरोपीने मुलीच्य घरात घुसून तिला कवटाळत तिचा विनयभंग केला होता. तसेच, माझ्याशी लग्न कर असे म्हणत अल्पवयीन मुलीला आरोपीकडून सातत्याने त्रास दिला जात होता. आरोपीच्या याच त्रासाला कंटाळून मुलीने विष प्राशन केले. त्यानंतर, तिला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, 22 जून रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव वाघ यांनी सांगितले. तसेच, आरोपी फरार असून त्याचे कुटुंबीय देखील घराला कुलूप लावून फरार झाले आहे. सध्या तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी अभिषेक देशमुख याचा शोध घेतला जात असल्याची माहितीही वाघ यांनी दिली.
हेही वाचा