Ajit Pawar On Home Ministry: राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आपल्या बेधडक आणि थेट बोलण्यामुळं चर्चेत असतात. आता त्यांनी एक अशीच थेट आणि स्पष्ट इच्छा बोलून दाखवली आहे. राज्याचं गृहमंत्रीपद आपल्याला हवं होतं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीची आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत भाषण केलं.
कुणीतरी मंचावर बसलेल्या नेत्यानं आता सरकार आलं की तुम्ही गृहमंत्री व्हा? असं अजित पवारांना म्हटलं. त्यावर अजित पवार म्हणाले की, मागे उपमुख्यमंत्रीपद दिलं त्यावेळी मी वरिष्ठांना म्हटलं की मला गृहखातं द्या. पण वरिष्ठांनाही वाटतं याला गृहमंत्रीपद दिलं तर हा आपलंही ऐकणार नाही,असं अजित पवार यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.
अजित पवार म्हणाले की, मला जे योग्य वाटतं तेच मी करणार. त्यात राष्ट्रवादीचा जरी कुणी म्हणत आला 'दादा, पोटात घ्या', तरी पोटात नाही ओठात नाही. सगळ्यांना नियम सारखाच. आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर मी जीवाचं रान करुन त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. पण तोच जर चुकलेला असेल तर मी पांघरुण कसं घालणार. पांघरुण घालून घालून पांघरुणं संपायची वेळ येईल.
अजित पवार म्हणाले, पहिल्यांदा अनिलरावांना (अनिल देशमुख) दिलं ते गेलं. म्हणलं आता तरी द्या. तरी दिलं नाही. ते दिलीपरावांकडे (दिलीप वळसे पाटील) गेलं. आता काय करणार. वरिष्ठांनी केल्यावर काही बोलता येत नाही, असंही अजित पवार म्हणाले.
काँग्रेस, भाजप अन् शिवसेना या तिन्ही पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री होण्याचा मान
अजित पवार हे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्याकडे वित्त व नियोजन खात्याची जबाबदारी होती. त्यानंतर त्यांनी 2019 ला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र काही तासांचंच हे सरकार ठरलं. नंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार आलं. यात देखील अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं. सोबत वित्त मंत्रालयाचीही जबाबदारी मिळाली. ठाकरे सरकारच्या काळात गृहमंत्रीपदाची जबाबदारी अनिल देशमुखांकडे होती. त्यांना ईडीनं अटक केल्यानंतर त्यांचं मंत्रीपद दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आलं.
इतर महत्वाच्या बातम्या