ठाणे : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare)  यांनी बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha Election) लढवणार अशी घोषणा काल केली होती. त्यावर आता अजित पवार गटानं (Ajit Pawar) तिखट प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरलं नाही तर कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha Election) वेगळा निकाल लागेल, अशा शब्दांत अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी इशारा दिला आहे. 


याचा अन्वयार्थ असा की कल्याणमधून श्रीकांत शिंदे लढणार हे निश्चित आहे. त्यामुळे तुम्ही अजित पवारांना बारामतीत डॅमेज केलंत तर आम्ही तुम्हाला कल्याणमध्ये डॅमेज करू असा थेट इशाराच अजित पवार गटानं दिला आहे. 


कल्याणमध्ये वेगळा निकाल लागू शकतो


विजय शिवतारे यांनी बारातमतीतून लढण्याची घोषणा केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे म्हणाले, राष्ट्रवादीचे शक्तीस्थळ असलेल्या बारामती आणि रायगड लोकसभा मतदारसंघावर मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या नेत्यांना आवारावं. आम्ही देखील स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कुणाला वाटत असेल की कल्याण लोकसभा निवडणूक जिंकणं फार सोपं आहे, तिकडे वेगळा निकाल लागू शकतो.


विजय शिवतारे यांचा अजित पवारांना इशारा


लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, आपण बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं शिंदे गटाचे नेते माजी आमदार विजय शिवतारे यांनी केलं होतं. ते म्हणाले होते की, "गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी 'शिवतारे आमदार कसा होतोय हे पाहतोच' असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. तो फक्त शिवतारेंचा अपमान नव्हता तर संपूर्ण पुरंदरचा अपमान होता. बारामती मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही, गेल्या 50 वर्षांपासून यांनाच आपण निवडून देतोय."


अजित पवार यांच्या विरोधात बारामती मतदारसंघात साडे पाच लाख मतदान असल्याचा दावा विजय शिवतारे यांनी केला होता. आता आपल्याला कुणीही सांगो, आपण लोकसभेला राहणारच असंही ते म्हणाले होते. 


विजय शिवतारे यांच्या वक्तव्यानंतर महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच त्याला आता जशास तसं उत्तर देण्याचं अजित पवार गटाने ठरवल्याची माहिती आहे. 


ही बातमी वाचा :