Mahadev Jankar On BJP : 'भाजपनं माझ्यासोबत धोका केला, मात्र मी त्यांच्यासोबत इमानदारीने राहिलो. ज्या दिवशी मी यांना धोका देईल त्या दिवशी यांचे सरकार राहणार नाही. मला मुख्यमंत्री नाही व्हायचं, पाच मिनिटं का होईना मला पंतप्रधान व्हायचंय असे म्हणत पुन्हा एकदा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. परभणीत (Parbhani) रासपच्या लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात महादेव जानकर बोलत होते.
भाजपने माझ्यासोबत आतापर्यंत धोका केला, मात्र मी इमानदारीने त्यांच्यासोबत राहिलो. मी ज्या दिवशी त्यांना धोका देईल त्या दिवशी यांचं सरकार राहणार नाही असा इशारा जानकर यांनी दिला आहे. तर, गोपीनाथ मुंडे गेल्याने पंकजा पेक्षा जास्त माझी वाताहत झाली असल्याची खंत रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी परभणीत बोलुन दाखवलीय. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीत जानकर यांना स्थान दिले जात नसल्याने ते नाराज आहेत.
लोकसभेतील जागावाटपावरून भाजपला इशारा...
रासपकडून परभणी लोकसभा मतदारसंघासाठी महादेव जानकर रिंगणात असणार असून, त्यानिमित्ताने परभणी लोकसभा मतदारसंघातील रासप कार्यकर्त्यांचा लोकसभा विजय निर्धार मेळावा जानकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी जानकर यांनी संपुर्ण कार्यक्रम हा व्यासपीठावर न जाता, खाली कार्यकर्त्यांमध्ये बसुन भाषण केले. तसेच कार्यकर्त्यांनी जानकर यांना पैश्यांचा हार घातला. या मेळाव्याला रासपच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलतांना महादेव जानकर यांनी भाजपला लक्ष करत लोकसभेतील जागावाटपावरून इशारा देखील दिला आहे.
...तर आज केंद्रात मंत्री राहिलो असतो
गोपीनाथ मुंडे गेल्याने पंकजा मुंडे यांच्यापेक्षा जास्त वाताहात माझी झाली आहे. गोपीनाथ मुंडे हयात असते तर मी आज केंद्रात मंत्री राहिलो असतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली. महत्त्वाचं म्हणजे मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, मला पाच मिनिटं का होईना देशाचं पंतप्रधान व्हायचंय अशी इच्छाही महादेव जानकर यांनी या मेळाव्यात बोलून दाखवली. तसेच, परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरही जाणकर ठाम असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
'महायुतीला आमची गरज नाही, तर आम्हालाही त्यांची गरज नाही'
लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील कोणत्या पक्षाला किती जागा देणार यावर कोणताही निर्णय झाला नसून, यासाठी दिल्लीत बैठका होतांना पाहायल मिळत आहे. अशात मित्रपक्षांना मात्र भाजपकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. महायुतीसोबत राहूनही महायुतीचे नेते आम्हाला विचारायला तयार नाहीत. मात्र आम्ही आमचं सक्षम आहोत. कुणी आम्हाला कितीही डावलल तरीही काहीही फरक पडणार नाही. महायुतीला आमची गरज नाही, तर आम्हालाही त्यांची गरज नाही, असेही जानकर म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :