Sunil Tatkare on Vijay Shivtare : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत आले तरी माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि अजित पवारांचा संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाहीये. बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) हा कोणाचा सातबारा नसल्याचा म्हणत पवार कुटुंबीयांवरही शिवतारेंनी निशाणा साधला आहे. विजय शिवतारेंच्या याच वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी व्यक्त केला आहे. काहींना त्यांच्या वक्तव्याचा आनंद झाला असेल, त्यांनी वक्तव्य केलं ते चूक आहे, महायुती भक्कम काम करत असताना असं वक्तव्य करणं गैर आहे, असं म्हणत सुनिल तटकरेंनी विजय शिवतारेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 


विजय शिवतारेंनी महायुतीच्या जागावाटपावरही त्यांनी भाष्य केलं. जागावाटपाबाबत दोन दिवसांत बैठक होण्याची शक्यता असल्याची माहितीही यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरेंनी दिली. तसेच, निलेश लंके शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच सुनिल तटकरेंना याबाबत विचारलं असता त्यांनी सावध भूमिका घेतली. माझं आणि त्यांचं बोलणं झालेलं नाही, बोलणं झालं की सांगतो, असं म्हणत सुनिल तटकरेंनी अधिक बोलणं टाळलं. 


शिवतारेंचं वक्तव्य गैर अन् संतापजनक : सुनिल तटकरे 


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) सुनिल तटकरे म्हणाले की, "माजी आमदार विजय शिवतारे यांचं वक्तव्य आहे, त्याचा मी निषेध व्यक्त करतो. शिवतारेंचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. 2019 मध्ये अजित पवारांनी शिवतारेंना आव्हान देत, कसे निवडून येतात ते आता पाहतोच, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शिवतारेंनी शरद पवारांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आता शिवतारेंनी जे वक्तव्य केलं, त्याचा काहींना आनंद झाला असेल, पण त्यांना हे माहीत नसेल की, 2019 मध्ये अजित पवारांनी शिवतारेंना जे आव्हान दिलं होतं, ते शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्यामुळेच दिलं होतं. मला असं वाटतं की, शिवतारेंनी जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत चूक आहे. राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्त्वात महायुती भक्कम काम करत असताना शिवतारेंनी असं वक्तव्य करणं गैर आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती करतो की, शिवतारेंच्या वक्तव्याची गंभीर नोंद घ्यावी आणि त्यांना समज द्यावी. मुख्यमंत्र्यांचा निर्णय मानायचा की नाही? हे शिवतारेंच्या हातात आहे." 


45 प्लस जागा जिंकण्याचा महायुतीचा प्रयत्न : सुनिल तटकरे


दोन दिवसात बैठक होण्याची शक्यता आहे. 80 टक्के जागांचं वाटप झालंय, खेळामेळीच्या वातावरणात ही बैठक होईल, 45 प्लस जागा आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू, काही अफवा आहेत, सर्वांना समान सन्मान मिळणार आहे, हिच भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची इच्छा आहे, असं सुनिल तटकरे म्हणाले. 


विजय शिवतारे नेमकं काय म्हणाले? 


अजित पवार महायुतीत आले तरी विजय शिवतारे आणि अजित पवारांचा संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाही. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांवर तोफ डागली. सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान, केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या जनतेचा असल्याचं शिवतारे यांनी म्हटलं. तसेच पवार इथे येऊन माफी मागणार का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसल्याचा म्हणत पवार कुटुंबियांवरही त्यांनी निशाणा साधला आहे. 


दरम्यान, शिवतारे आणि अजित पवारांच्या वादाचे पडसाद बारामती लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतात. याचं कारण म्हणजे, शिवतारे यांचा पुरंदर मतदारसंघ आहे, जो बारामती लोकसभा मतदारंसघात येतो. महायुतीला जर सुप्रिया सुळेंचा पराभव करायचा असेल, तर सहा पैकी एका मतदारसंघातला नेता नाराज असणं फारसं परवडणारं नाहीये, असं राजकीय जाणकार सांगतात. 


पाहा व्हिडीओ : Sunil Tatkare PC :शिवतारेंच्या 'त्या'वक्तव्यावर सुनील तटकरे म्हणाले...



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maharashtra Politics : मोठी बातमी! विजय शिवतारे अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत, बारामतीत मोठा निर्णय जाहीर