Ajit Pawar NCP on Vijay Shivtare : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शाब्दिक हल्ले सुरुच आहेत. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत वापरलेल्या शब्दांची आठवण करुन देत विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात शड्डू ठोकलाय. शिवाय, अजित पवारांचा बदला घेणार, असंही स्पष्ट केलय. दरम्यान विजय शिवतारे यांनी अजित पवारांचा विचू म्हणून उल्लेख केला आहे. दरम्यान, यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विजय शिवतारे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवार गटाचा भाजपला इशारा
"महायुतीत असताना देखील विजय शिवतारे हे वारंवार अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत. अजित पवारांना 'विंचू' म्हणणाऱ्या विजय शिवतारेवर कारवाई करा. जर भाजपने कारवाई केली नाही तर याचे परिणाम महायुतीवर होतील", असा इशारा अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला आहे. ते सोलापुरात बोलत होते. शिवाय अमोल मिटकरी यांनीही विजय शिवतारे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान; बार्गेनिंग पॉवर वाढवून पाच-पन्नास लाख रुपये मिळवण्याचा प्रयत्न करतोय, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे.
काय म्हणाले होते विजय शिवातारे ?
झुंडशाही आणि घराणेशाहीच्या लढाईच्या विरोधात मी मैदानात उतरलो आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय सामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन पर्व सुरु करण्यासाठी मी लढाई लढतो आहे. कुणाला पाडण्यासाठी नाही तर पवार पर्व संपवण्यासाठी मी लढतो आहे. अजित पवारांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या तेव्हा तुम्ही गप्प बसलात. शरद पवारांनाही हे माहीत आहे. रावण्याचा वध करण्यासाठी बापू ठाम आहे, अशी टीका विजय शिवतारे यांनी केली होती.
विजय शिवतारेंची बारामतीमध्ये कुरघोडी
विजय शिवतारे सध्या महायुतीमध्ये आहेत. मात्र, तरिही त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असे जाहीर केले आहे. शिवाय प्रत्येक मतदारसंघात सभा घेणार असेही त्यांनी जाहीर केले आहे. यापूर्वी त्यांनी बारामतीमध्ये पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. त्यामुळे विजय शिवतारे यांनी महायुतीमध्ये असूनही अजित पवार यांच्याविरोधात कुरघोडी करण्यास कोठेही कसर सोडलेले नाही.
इतर महत्वाच्या बातम्या