अमरावती : सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) राज्यात धूम आहे. या निवडणुकीत अनेक मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अमरावती मतदारसंघदेखील यापैकीच एक आहे. या मतदारसंघात महायुतीने (Mahayuti) अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. दरम्यान, महायुतीचा भाग असलेले बच्चू कडू (Bacchu Kadu) या मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप घडवून आणण्याची शक्यता आहे. कारण महायुतीचा भाग असूनदेखील ते येथे आपल्या पक्षातर्फे उमेदवार देणार आहेत.
बच्चू कडू अमरावतीतून उमेदवार देणार
बच्चू कडू यांनी आपल्या पक्षातर्फे उमेदवाराची घोषणा केल्यास महायुतीच्या अडचणी वाढू शकतात. कारण या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार उभा राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अमरावतीच्या विद्यमान खासदार रवी राणा यादेखील पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास उत्सूक आहेत. त्यांचा युवा स्वाभिमानी पार्टी हा पक्षदेखील महायुतीचा भाग आहे. अशी ही गुंतागुंत असताना बच्चू कडू यांनी आम्ही अमरावतीतून उमेदवार देणार आहोत, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे भाजप, नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बच्चू कडू काय म्हणाले?
बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातून त्यांच्या प्रहार या पक्षातर्फे उमेदवार उभा करणार आहेत. तशी माहिती त्यांनीच दिली आहे. आमचा उमेदवार एक लाख मताच्या फरकाने निवडून येणार आहे. आमचा उमेदवार हा अतिशय काकदीचा आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, दलित संघटना तसेच आघाडीतील नाराज घटक यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवणार आहोत. येत्या 3 तारखेला आम्ही आमच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करू, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
अमरावतीत मैत्रीपूर्ण लढत असेल
बच्चू कडू यांच्या या निर्णयामुळे ते आगामी काळात महायुतीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी महायुतीतून बहेर पडणार नाही. अमरावतीत आमची मैत्रीपूर्ण लढत असेल. आमच्या उमदेवाराचे नाव आताच जाहीर करता येणार नाही. इतर ठिकाणी आम्ही महायुतीतच असणार आहेत. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना आमचा हा निर्णय मान्य होणार की नाही, याचा आम्ही विचार केलेला नाही. मी याबाबत महायुतीच्या कोणाशीही संवाद साधलेला नाही, असेही कडू यांनी सांगितले.
आमचे कार्यकर्ते नाराजी, कार्यकर्त्यांना धमकी दिली जातेय
आमच्या कार्यकर्त्यांत नाराजी आहे. अमरावतीमध्ये आमची ताकद असूनही आम्हाला विचारले जात नाही, असे येथील कार्यकर्त्यांचे मत आहे. आमच्या कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. महायुतीचा उमेदवारच आमच्या कार्यकर्त्यांना धमकी देत आहे, असा आरोपही कडू यांनी दिला.
बच्चू कडू यांचा उमेदवार कोण असणार?
दरम्यान, बच्चू कडू अमरावतीतून नेमकं कोणाला उमेदवारी देणार, हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अमरावती शहर अध्यक्ष दिनेश बुब यांच्या नावाची चर्चा होती. मात्र खुद्द बच्चू कडू यांनीच ही चर्चा फेटाळून लावली आहे. आमचा उमेदवार हा भाजपचा नेता असेल. या उमेदवाराची अमरावतीत मोठी ताकद आहे, असे कडू यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भाजपचा हा नेता नेमका कोण आहे? असा प्रश्न विचारला जात आहे.