मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा उमेदवाराची घोषणा करण्यात आली. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला चार ते पाच जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजितदादा गटाकडून एकाच टप्प्यात लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, अशी अपेक्षा होती. परंतु, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केवळ बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा केली. बारामती लोकसभेची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देण्यात आली. त्यामुळे आता बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.


विजय शिवतारे यांनी शनिवारी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन बंडाची तलवार म्यान केली होती. त्यांनी आपण बारामतीच्या रिंगणातून माघार घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढाई होणार आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी फार पूर्वीपासूनच बारामतीमध्ये प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, या दोघींनाही आज पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे बारामती लोकसभेतील प्रचाराची रणधुमाळी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.


शरद पवार गटाकडून लोकसभेचे पाच उमेदवार घोषित


शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शनिवारी लोकसभेच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. त्यानुसार शरद पवार गटाने वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कराव भगरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे आणि अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे. शरद पवार गटाने उमेदवार घोषित करताच काहीवेळातच सुनील तटकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली.


मुळशीत सुनेत्रा पवारांची रिमझिम पावसात सभा


बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पिरंगुट, भुकुम भागात विविध सोसायट्यांना भेटी देत नागरीकांशी संवाद साधला. भुकुम येथील एका सोसायटीत संवाद कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्या भाषणावेळीच रिमझिम पावसाला सुरुवात झाली.. या पाऊसधारा म्हणजे आपल्यावर झालेली कृपा आहे, असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी रिमझिम पावसातही उपस्थित नागरीकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोसायट्यांमधील विविध प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यावर भर दिला जाईल अशी ग्वाही दिली. त्याचवेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी अजितदादांच्या विचारांचा खासदार निवडून द्यावा, असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले.


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar's NCP first candidate list : शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या नेत्यांना संधी?