Nawab Malik: ईडीच्या (ED) कोठडीत असलेल्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना जामीन मिळून देण्यासाठी पैसे मागणाऱ्या विरोधात मलिक यांच्या मुलाने गुन्हा दाखल केला आहे. अमीर मलिक यांच्या तक्रारीवरून व्हीबी नगर पोलिसांनी इम्तियाज नावाच्या एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुर्ल्यातील जमिनीच्या व्यवहारात ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली होती. या प्रकरणात आरोपी इम्तियाजने दावा केला आहे की, तो नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. त्यासाठी त्याने तीन कोटी रुपयांची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने तीन कोटीची ही रक्कम बिटकॉइन्सच्या स्वरूपात मागितली होती. या व्यक्तीने अमीर यांना दुबईहून फोन केला होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


नवाब मलिक यांच्यावर काय आहे आरोप?  


नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. 7 मार्च रोजी त्यांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई न्यायालयाने त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


दरम्यान, नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी केवळ 55 लाख रुपये दिले होते. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.


संबंधित बातम्या: 


'दाऊदचा नातेवाईक आणि बलात्काराच्या आरोपीसह देवेंद्र फडणवीस!' म्हणत नवाब मलिकांच्या मुलीकडून फोटो ट्वीट
Nawab Malik : नवाब मलिकांच्या ED अटकेबाबतची याचिका 15 मार्चपर्यंत राखून ठेवली - उच्च न्यायालय