छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीला मत (Maha vikas Aghadi) देणं म्हणजे पाकिस्तानला मत (Pakistan) देणे आहे, असं वक्तव्य अमरावती (Amravati) लोकसभेच्या उमेदवार (Lok Sabha Candidate) नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलं आहे. काँग्रेसला (Congress) लव लेटर पाकिस्तान लिहित आहे आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचा प्रचार करतात, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. वीस वर्ष खासदार राहिलेले आता दुवा मागताय, बाळासाहेब ठाकरे सुद्धा बघून रडत असतील, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे. उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या महिला मेळाव्याला छत्रपती संभाजीनगर मधील सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


नवनीत राणांची जहरी टीका


नवनीत राणा म्हणाल्या, महिलांना जेव्हा भेटत होते, तेव्हा एक आशा त्यांच्या डोळ्यात दिसत होती. देशाचे पंतप्रधान कोण होणार? मोदी ना? मग येथेच समोरचा उमेदवार पराभूत झाला.  मशाल घेऊन उभा आहे समोरचा उमेदवार, त्यांच्या मनात पाकिस्तानचे विचार आहेत. एमआयएम सुद्धा यामध्ये आहे. औरंगजेबची औलाद मागच्या पाच वर्षे येथे खासदार होते, यांचे नेते म्हणतात की, मोदी यांना गाढा. अरे आमच्या संस्कृतीमध्ये गाढत नाही तर अग्नी देतात. 


महाविकास आघाडीला मत म्हणजे पाकिस्तानला मत


जिथे-जिथे आपल्या महिला हिताची गोष्ट आली,  त्याच्या विरोध एमआयएमने केला. पाकिस्तान काँग्रेसला लव लेटर लिहित आहे आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचा प्रचार करतात आणि उद्धव ठाकरेंचा उमेदवाराचा प्रचाराला काँग्रेसचे लोक येत आहे. महाविकास आघाडीला मत देणे म्हणजे पाकिस्तानला मत देणे आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नावाला डाग लावला तो एमआयएमच्या खासदाराने, असं म्हणत नवनीत राणा यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.


ओवैसींवर नवनीत राणांची टीका


ओवेसी छोटा आणि मोठा काय म्हणतात, आम्हाला पंधरा मिनिटे द्या म्हणतात. अरे वीस कोटी जनता तुमची, तुम्ही पंधरा मिनिट मागता, आम्ही फक्त पंधरा सेकंद मागतो. आम्ही ओवैसीच्या कोणत्याच भावाला मानत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल होऊन सुद्धा पुन्हा त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


बाळासाहेब ठाकरे सुद्धा बघून रडत असतील...


वीस वर्ष खासदार राहिलेले, आता दुवा मागताय, बाळासाहेब ठाकरे सुद्धा बघून रडत असतील. अरे माझा पक्ष हिंदुत्ववादी होता आणि तुम्ही हे काय करताय? शिवसेना डुबविण्याचं काम यांनी केलं. हनुमान चालीसा पठण मला मातोश्री बाहेर करायचं होतं, पण यांनी मला चौदा दिवस जेलमध्ये टाकलं. मग काय झालं? बघितलं. चाळीस आमदार यांच्यापासून दूर निघून गेले. जो वडिलांचे विचार घेऊन जगत नाही, तो तुमच्यासाठी काय करणार? असं म्हणत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.