Ambadas Danve : सातारा लोकसभा जागेवरून (Satara Loksabha) महायुतीमध्ये तिढा कायम आहे. या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे, भाजपच्या पहिल्या यादीमध्ये सातारा लोकसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न आल्याने कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेसाठी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये तळ ठोकूनही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट न झाल्याने सातारच्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. उदयनराजे यांना उमेदवारी मिळणार की नाही? याकडे फक्त सातारा नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. 


महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा दिल्लीत अपमान


उदयनराजे दोन दिवस दिल्ली ताठकळत राहिल्याने आता शिवसेना ठाकरे गटाने भाजपवर खोचक शब्दात टीका केली आहे. आम्ही शाहू महाराजांना जागा दिली मात्र कोणी काहीच बोललं नाही. मात्र, भाजप महाराष्ट्राचा स्वाभिमान खालावत असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान कसा दिल्लीमध्ये केला जात आहे हे दिसून येत असल्याचे ते म्हणाले.


आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढू


दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले की, संभाजीनगर जागेवर कोणत्याही प्रकारचा तिढा नसून अधिकृत यादी समोर आल्यानंतर स्पष्ट होईल आणि ती यादी सामनातून जाहीर होईल. साहेबांनी जिल्हानिहाय नावे जाहीर केले असली तरी सामनामधून अधिकृतरित्या जाहीर होईल. योग्य वेळी सर्व यादी जाहीर होणार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. भाजप आणि शिंदे गट वेगळा नाही, शिंदे गट नावाला असल्याचा टोला दानवे यांनी लगावला. त्यामुळे तिकीट कोणाला मिळणार हे आम्ही बघत नाही, आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढू असे त्यांनी स्पष्ट केले. 


उद्धव ठाकरे यांची मनामध्ये भीती


दरम्यान मनसेच्या महायुतीमधील मनसेच्या समावेशावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मला वाटत नाही अशा गोष्टी होतील, या आधीच ठरलेल्या असतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मनामध्ये भीती आहे तेच याठिकाणी दिसून येत असल्याचा टोला त्यांनी लगावला. ठाकरे नाव पाहिजे पण ठाकरे नाव आणि मनगट फक्त उद्धव ठाकरे असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. 


आढळराव पाटील हे शिंदे गटातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याने दानवे यांनी सांगितले की, हे सर्व काही सत्तेसाठी सुरू आहे. बाळासाहेबांचे विचार, विकासकामे काही नसून हे सर्व सत्तेसाठी गेल्याची टीका त्यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या