मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर (Maharashtra Tour)आहेत. यानिमित्तानं ते विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील कार्यक्रमाला हजेरी लावतील. मोदी त्यानंतर ठाणे आणि मुंबईतील विकास कामांच्या पायाभरणी आणि लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दलच्या आयोजित कार्यक्रमाला देखील ते उपस्थित राहणार आहेत.
वाशिममध्ये नंगारा भवन लोकार्पण, पीएम किसानच्या 18 व्या हप्त्याचं वितरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिममधील पोहरादेवी येथील नंगारा भवनच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मोदी बंजारा महंतांशी चर्चा करतील. वाशिम जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याचं आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहेत. वाशिममध्ये पंतप्रधान 23 हजार 300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे प्रत्येकी 2 हजार म्हणजेच 4 हजार रुपये मिळणार आहेत.
ठाण्यात विविध प्रकल्पांची पायाभरणी
वाशिममधील कार्यक्रम झाल्यानंतर नरेंद्र मोदी ठाणे आणि मुंबईतील कार्यक्रमांसाठी रवाना होतील. ठाण्यात 32 हजार 800 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
आरे ते बीकेसी भूमिगत मेट्रोचं लोकार्पण
आज सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी ते आरे जेव्हीएलआर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील, त्यानंतर बीकेसी ते सांताक्रूझ मेट्रो प्रवास देखील करणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. कुलाबा ते सीप्झ यापैकी पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. आरे ते बीकेसी या लाईन वरील सेवा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 10 स्थानकांपैकी 9 स्थानकं भूमिगत असणार आहेत.
केंद्र सरकारनं मराठी भाषेसह एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला होता. महाराष्ट्र सरकारची कित्येक वर्षांची मागणी यानिमित्तानं पूर्ण झाली होती. त्यानिमित्तानं बीकेसीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. अभिजात मराठी सन्मान सोहळा बीकेसीमध्ये पार पडणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सन्मान आणि कृतज्ञता सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नामांकित साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. आज सायंकाळी हा सोहळा पार पडणार आहे.
इतर बातम्या :