Maharashtra: उद्धव ठाकरे यांनीच आमच्याशी असलेली युती तोडली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी काल NDA खासदारांच्या बैठकीत केला. त्यावर भाजपचे तत्कालीन नेते आणि सध्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पलटवार केला आहे. नरेंद्र मोदी यांनी काल जे सांगितलं ते सत्य नाही, असं म्हणत एकनाथ खडसेंनी पंतप्रधान मोदींची पोलखोल केली आहे.


मोदींनी सांगितलं ते अर्धसत्य


राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे माध्यमांशी संवाद साधत होते. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014मध्ये भाजपसोबतची युती शिवसेनेनेच तोडल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे यांनीच युती तोडली, असं मोदी म्हणाले. मात्र मोदींनी खासदारांना जे सांगितलं ते अर्धसत्य असल्याचं खडसे म्हणाले. 2014 मधील शिवसेनेसोबतची युती भाजपनेच तोडल्याचं ते म्हणाले.


भाजपला अधिक जागा मिळाव्या म्हणून भाजपनेच युती तोडली


युती तोडण्यामागे जागा वाटप हा एक मुद्दा असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र त्यावेळी देशात भाजपचं वातावरण होतं, भाजपकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला होता, शिवसेना 171 जागा लढत होती, अशा वेळी भाजपला अधिकच्या जागा मिळाव्या, यासाठी भाजपनं युती तोडल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला आहे. भाजपची स्वबळावर सत्ता येऊ शकते, असा विश्वास वाटल्याने भाजपने शिवसेनेशी युती तोडल्याचं ते म्हणाले.


भाजपचा दबदबा निर्माण झाल्यावर युती तोडली


2014 मध्ये अनेक लोक भाजपमध्ये येऊ लागले होते, पण महाराष्ट्रातल्या अधिकच्या जागा शिवसेनेकडे होत्या. मग आता भाजपात येणाऱ्यांना तिकीट द्यायचं कुठे? असा प्रश्न भाजपसमोर उभा राहिला, असं खडसे म्हणाले. त्यावेळी खडसे भाजपात होते आणि आपल्याला जास्त जागा मिळत नसल्यानं स्वबळावर लढावं, असं भाजपचं ठरलं. महाराष्ट्रात भाजपच जिंकेल, असा विश्वास आल्याने भाजपने शिवसेनेशी युती तोडायचं ठरवलं.


खडसेंवर सोपावली होती युती तोडण्याची जबाबदारी


फडणवीसांनी खडसेंना मुंबईत बोलावलं आणि खडसेंवर युती तोडण्याची जबाबदारी सोपावली. खडसेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि जागा वाटपावरून जमत नसल्याचं कारण सांगून त्यांनी युती तोडली. देसाई आणि अरविंद सावंत खडसेंकडे युती तोडू नका सांगण्यासाठी आले असता, त्यांनी हा निर्णय माझा नसून पक्षाचा असल्याचं म्हटलं होतं. पण तेव्हा मलाच बदनाम केलं गेलं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.


शिंदे अधिक प्रभावी होऊ नये यासाठी राष्ट्रवादीला सोबत घेतलं 


लोकसभेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना पक्ष फोडला तेव्हा एकनाथ शिंदे अधिक बीजेपी असं बहुमत झालं होतं. तिसऱ्या पक्षाला सोबत घेण्याची गरज नव्हती. पण सर्व्हे आले. त्यात शिंदे गट आणि भाजप एकत्र येऊनही सत्तेत येऊ शकत नसल्याचं स्पष्ट झालं. त्यातच एकनाथ शिंदे अधिक प्रभावी ठरू नये, म्हणून राष्ट्रवादीचा एक गट सोबत घेण्यात आला. सीनिअर आणि ज्युनिअर उपमुख्यमंत्री झाले, असं खडसे म्हणाले.


हेही वाचा: