नवी दिल्ली: महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नव्हे असं पंतप्रधान मोदी (PM Modi) एनडीए (NDA) खासदारांच्या बैठकीत म्हणाले. एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा देखील त्यांनी दाखला दिला. यापुढे देखील आपल्याला एनडीए म्हणून काम करायचं आहे, काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असंही मोदी म्हणाल्याचं कळतंय.


काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी,  शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही


नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मंगळवारी संध्याकाळी एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अजित पवार गटाचे खासदारही बैठकीसाठी हजर होते. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन मेघवाल आणि जे पी नड्डा उपस्थित होते. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केलं, असे म्हणत एनडीए बैठकीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या अहंकारी उदाहरणांचा दाखला दिला. 


शिवसेना आमच्याबरोबर सत्तेत असताना सामनातून माझ्यावर टीका 


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती त्यावेळी सामना वृत्तपत्रात माझ्यवर टीका केली जायची. कारण नसताना वाद निर्माण होत असे. आम्ही अनेक वेळा सहन केले. तुम्हाला सत्तेत पण राहायचे आहे आणि तुम्हाला आमच्यावर टीका पण करायची आहे या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील? बिहारमध्ये कमी संख्या असतानाही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. एकनाथ शिंदे आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. आमचे मित्र आमच्यासाठी महत्वाचे आहेत.आपण  एकत्र राहू, सर्वांचा आदर केला जाईल. भाजप काँग्रेससारखा अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेतून जाणार नाही.


विकासासाठी महाराष्ट्र, राजस्थान निवडणुका महत्त्वाच्या


 महाराष्ट्राच्या विकासासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.  यावेळी पीएम मोदींनी राजस्थानच्या खासदारांना संबोधित करताना सांगितले की, राजस्थानमधील कोणत्याही सरकारची स्थिती आता इतकी वाईट नाही. भारताच्या विकासासाठी राजस्थानची निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. राजस्थानची निवडणूक जिंकणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. मी वैयक्तिकरित्या घराणेशाहीच्या राजकारणाच्या विरोधात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.


हे ही वाचा :             


No Confidence Motion: विरोधकांचा मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव; लोकसभेतील मतांचं गणित काय?