Rahul Gandhi in Lok Sabha : आज दुसऱ्या दिवशी संसदेत विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाषण केलं. भाषणातून राहुल गांधींनी मोदी सरकारवर थेट प्रहार केले. मणिपूर हिंसाचारावरुन राहुल गांधींनी मोदी सरकारवर फैलावर घेतलं. मणिपूरमध्ये मोदी सरकारनं भारत मातेची हत्या केली, असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकावर थेटच निशाणा साधला. त्यानंतर संसदेत एकच गदारोळ झाला. 


अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सूफी संत जलालुद्दीन रुमी यांच्या काही शब्दांनी केली. उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत त्यांनी सरकारला टोलाही लगावला आणि भारत जोडो यात्रेचा उद्देश सांगितला. तसेच, त्यानंतर त्यांनी थेट मणिपूर हिंसाचारावरुन मोदी सरकारला घेरलं. 


"मागच्या वेळी अदानींच्या मुद्द्यावर मी बोललो, तुमचे ज्येष्ठ नेते त्रस्त झाले असावेत"


राहुल गांधी भाषणाला सुरुवात करताना म्हणाले, सभापती महोदय, मला लोकसभेची खासदारकी बहाल केल्याबद्दल धन्यवाद. मी मागच्या वेळी (संसदेत) बोललो तेव्हा मी तुम्हाला दुखावलं असावं. मला तुमची (सभापतींची) माफी मागायची आहे. मागच्या वेळी अदानींच्या मुद्द्यावर मी बोललो होतो. त्यामुळे तुमचे ज्येष्ठ नेते त्रस्त झाले असावे. पण तुम्हाला आता घाबरण्याची गरज नाही. आज माझं भाषण अदानींवर नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन आराम करू शकता. शांत राहू शकता.


'जो शब्द दिल से आते हैं, वो दिल में जाते हैं'


राहुल गांधी म्हणाले की, "रुमी म्हणाले होते, "जो शब्द दिल से आते हैं, वो शब्द दिल में जाते हैं". त्यामुळे आज मला माझ्या मेंदूतून नाही तर हृदयापासून बोलायचं आहे आणि मी तुमच्यावर अजिबात टीका करणार नाही. मी एक किंवा दोन निशाणे नक्कीच साधेल, परंतु मी इतकी टीकास्त्र डागणार नाही. तुम्ही लोक आराम करू शकता. 


"कदाचित मला माहित नव्हतं... मी यात्रा का काढली आहे?"


राहुल गांधी म्हणाले की, 130 दिवस भारताच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात गेलो. समुद्र किनाऱ्यापासून काश्मीरच्या बर्फाळ टेकडीपर्यंत चालत गेलो. अनेकांनी मला विचारलं, यात्रेच्या दरम्यान तुम्ही चालत का आहात? तुम्ही कन्याकुमारीहून काश्मीरला का जात आहात? सुरुवातीला मला त्यांना उत्तर देताच येईना. कदाचित ही यात्रा का करतोय, हेच मला माहित नव्हतं. मला लोकांना जाणून घ्यायचं होतं, त्यांना समजून घ्यायचं होतं. थोड्या वेळानं मला समजू लागलं. ज्यासाठी मी मरायला तयार आहे, ज्यासाठी मी मोदींच्या तुरुंगात जाण्यास तयार आहे. ज्यासाठी मला दररोज शिवीगाळही झाली आहे, तिच गोष्ट समजून घ्यायची होती. हे काय आहे? ज्यानं माझं हृदय इतकं घट्ट धरलं होतं, त्याला समजून घ्यायचं होतं.


"माझा अहंकार निघून गेला"


राहुल गांधी म्हणाले की, मी रोज 8-10 किमी चालायचो. त्यावेळी मला वाटायचं मी 20-25 किमी चालू शकतो. माझ्यात अहंकार होता. पण भारत काही सेकंदात अहंकार नष्ट करतो. दोन-तीन दिवसांत माझे गुडघे इतके दुखू लागले की, माझा अहंकार निघून गेला. माझा अहंकार लांडग्यापासून मुंगीसारखा झाला.


"शेतकऱ्याचं दुःख समजून घेतलं"


राहुल गांधी म्हणाले की, यात्रेदरम्यान एका शेतकऱ्यानं कापसाचा गठ्ठा दिला. तो शेतकरी म्हणाला, राहुलजी माझ्याकडे हेच राहिलं आहे. बाकी काही राहिलेलं नाही. राहुल गांधी म्हणाले की, मी शेतकऱ्याला विचारलं की, विम्याचे पैसे मिळाले का? तो म्हणाला नाही... भारतातील बड्या उद्योगपतींनी ते हिसकावून घेतले. राहुल गांधी म्हणाले, मी एक विचित्र गोष्ट पाहिली. त्याच्या हृदयातील वेदना मला जाणवल्या. त्याच्या वेदना माझ्या वेदना झाल्या.


"भारत एक आवाज"


राहुल गांधी म्हणाले, लोक म्हणतात हा देश आहे, काही म्हणतात या वेगवेगळ्या भाषा आहेत. काही म्हणतात की धर्म आहे. हे सोनं आहे. हे चांदी आहे. पण सत्य हेच आहे की, हा देश फक्त एक आवाज आहे. वेदना आहे, दु:ख आहे. अडचण आहे. हा आवाज ऐकायचा असेल तर आपला अहंकार, आपली स्वप्नं बाजूला ठेवावी लागतील. तरच तो आवाज ऐकू येईल.


"मणिपूरचं सत्य हेच आहे की, मणिपूर आता उरलेलंच नाही"


राहुल गांधी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मणिपूरला गेलो होतो. पण आमचे पंतप्रधान गेले नाहीत. कारण मणिपूर त्यांच्यासाठी भारत नाही. मणिपूरचे सत्य हेच आहे की, मणिपूर आता उरलेलंच नाही. तुम्ही मणिपूरचे दोन भाग केले आहेत. तुटलं आहे मणिपूर. मी रिलीफ कॅम्पमध्ये गेलो आहे, तिथल्या महिलांशी बोललो. एका महिलेला विचारलं की, तुमच्यासोबत काय झालं? ती म्हणाली, माझा लहान मुलगा, एकुलता एक मुलगा होता. त्याला माझ्या डोळ्यांसमोर गोळ्या घालण्यात आल्या. मी रात्रभर त्याच्या मृतदेहासोबत पडून राहिले. मग मी घाबरले, मी माझं घर सोडलं. मी विचारलं की, घर सोडताना काहीतरी आणलं असेल. ती म्हणाली की, माझ्याकडे फक्त माझे कपडे आहेत आणि तिच्याजवळचा एक फोटो दाखवत म्हणाली, माझ्याकडे फक्त हीच गोष्ट उरली आहे. 


"मणिपूरमध्ये मोदी सरकारनं भारताची हत्या केली"


राहुल गांधी म्हणाले की, दुसऱ्या एका रिलीफ कॅम्पमध्ये एक महिला माझ्याकडे आली, मी तिला विचारलं, तुझ्यासोबत काय झालं? मी तिला हा प्रश्न विचारताच क्षणार्धात ती थरथरू लागली. तिच्या मनात त्या विदारक आठवणी जाग्या झाल्या आणि ती बेशुद्ध झाली. माझ्यासमोर ती महिला बेशुद्धा झाली. ही दोनच उदाहरणं मी सांगितली आहेत. त्यांनी मणिपूरमध्ये भारताची हत्या केली आहे. त्यांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे. मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या झाली आहे.


दरम्यान, राहुल यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षानं गदारोळ केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, मणिपूरमध्ये सात दशकात जे काही घडलं त्याला काँग्रेस जबाबदार आहे. राहुल गांधी यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे.