रत्नागिरी : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोकणातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri-Sindhudurg) मतदारसंघात नारायण राणेंना (Narayan Rane) शिवसेनेच्या विनायक राऊत यांचं आव्हान आहे. त्यामुळे, महायुतीचे सर्वच पक्ष नारायण राणेंच्या विजयासाठी कंबर कसून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही नारायण राणेंसाठी कणकवलीत जाहीर सभा घेणार आहेत. तत्पूर्वी आपली उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच नारायण राणेंनी निवडणूक प्रचाराला सुरुवातही केली होती. केद्र सरकारमध्ये सुक्ष्म व लघु उद्योग खातं असलेल्या राणेंना भाजपाने लोकसभेच्या मैदानात उतरवत शिवसेनेला कडवं आव्हान दिलं आहे. शिवसेनेतील (Shivsena) फुटीमुळे राणेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उदय सामंत यांचीही साथ मिळणार आहे. त्यामुळे, येथून माझा विजय निश्चित असल्याचं राणेंनी म्हटलं.  यावेळी भाजपा महायुतीला राज्यात किती जागा जिंकता येतील, यावरही त्यांनी भाष्य केलं. 


नारायण राणे सध्या मतदारसंघात प्रचारासाठी फिरत असून गावदौर व गाठीभेटींच्या माध्यमातून ते लोकांपर्यत पोहोचत आहेत. यादरम्यान, आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना, मी 3 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होणार असल्याचे राणेंनी म्हटले. मी सध्या राज्यसभेत खासदार असून केंद्र सरकारमध्ये मंत्री आहे. मी 10 वर्षांनी लोकसभेत जात नाही, कारण मंत्री ससंदेच्या दोन्ही सभागृहात काम करत असतात. मी बोलायची आवश्यकता नाही, लोकांचा उदंड प्रतिसाद असून मी एकतर्फी विजय मिळवेल, असे राणेंनी म्हटले. मी 3 लाख मतांधिक्य घेऊन विजय मिळवेल, तर महायुतीला 38 ते 40 जागांवर विजय मिळेल, असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला. यावेळी, स्थानिक विषयावरही त्यांनी भाष्य केलं. पाण्याची समस्या, पावसाळ्यातील पुराचा प्रश्न आहे, नोकरीच्या समस्या असून पुढील 1 वर्षात आम्ही हे सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासनही राणेंनी पत्रकारांशी बोलताना दिले. तसेच, उद्धव ठाकरेंवरील प्रश्नावर उत्तर देण्याचं टाळलं. सायकिक लोकांवर बोलण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, असे राणेंनी म्हटले.


दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उमेदवार विनायक राऊत मैदानात आहेत. राऊत यांच्यासाठी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी सभा घेतली. यावेळी, भाजपाने त्यांच्या कुवतीप्रमाणे सुक्ष्म व लघु खातंच त्यांना दिलं. पण, आजपर्यंत एकतरी सुक्ष्म किंवा लघु प्रकल्प कोकणात आणला का?, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर बोचरी टीकाही केली होता. आता, ठाकरेंनी केलेल्या टीकेसंदर्भात राणेंना विचारले असता, त्यांनी जाहीर सभे बोलेन, असे उत्तर पत्रकारांना दिले.   






राणेंसाठी भाजपाची रणनीती


रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार नारायण राणे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय व्हावा याकरिता भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती जाहीर केली. त्यामध्ये आमदार, माजी मंत्री, खासदार, जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. या पदाधिकाऱ्यांची विधानसभानिहाय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांनी 25 एप्रिल ते 5 मे या कालावधीत ते मतदारसंघात पूर्णवेळ मुक्कामी जाऊन प्रत्येक बूथ विजयी करण्याची जबाबदारी भाजापाने दिली आहे.